अभियांत्रिकी, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरु
USER

अभियांत्रिकी, फार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरु

नाशिक | प्रतिनिधी

बहुप्रतिक्षित अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्‍त्र अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेश प्रक्रियेला बुधवार (दि. ९) पासून सुरवात झाली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना कॅप राउंडच्‍या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी, ई-स्‍क्रुटीनीची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. अंतीम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्‍यानंतर कॅप राउंडच्या प्रत्‍यक्ष प्रक्रियेला सुरवात होणार आहे...

अभियांत्रिकीच्‍या बी. ई, बी. टेक. अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. कागदपत्रे पडताळणी आणि निश्‍चितीच्‍या प्रक्रियेसाठी १६ डिसेंबरपर्यंतचा कालावधी उपलब्‍ध असेल.

सध्याचा कोरोनाची परिस्‍थिती लक्षात घेता कागदपत्रांची ई-स्‍क्रुटीनी केली जाणार असून, विद्यार्थ्यांना या केंद्राला भेट देण्याची आवश्‍यकता राहणार नाही. तांत्रिक त्रुटी असल्‍यास विद्यार्थ्यांच्‍या लॉग-ईनवर यासंदर्भातील माहिती कळविली जाईल. १५ डिसेंबरनंतर ऑनलाइन नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांचे अर्ज नॉन कॅप जागांसाठी ग्राह्य धरले जाणार असल्‍याचे सीईटी सेलतर्फे स्‍पष्ट केले आहे.

दरम्‍यान, तात्‍पुरती गुणवत्ता यादी १८ डिसेंबरला जारी केली जाईल. यासंदर्भातील हरकती नोंदविण्यासाठी १९ व २० डिसेंबर असा कालावधी उपलब्‍ध असेल. २२ डिसेंबरला अंतीम गुणवत्ता यादी जारी केली जाईल.

दरम्यान, सध्याच्‍या वेळापत्रकानुसार पहिल्‍या कॅप राउंडकरीता विद्यार्थ्यांना ऑनलाइन स्‍वरूपात पर्याय नोंदविण्यासाठी २३ ते २५ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. २८ डिसेंबरला निवडीचा तपशील जारी केला जाईल. तर विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी २९ ते ३१ डिसेंबर अशी मुदत असेल.

२ ते ४ जानेवारीदरम्‍यान दुसऱ्या कॅप राउंडकरीता पर्याय निवडीची प्रक्रिया राबविता येईल. निवडीचा तपशील ६ जानेवारीला जारी केल्‍यानंतर प्रवेश निश्‍चितीसाठी ७ ते ९ जानेवारी अशी मुदत असेल.

औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील बी. फार्मसी, फार्म. डी. शिक्षणक्रमाच्‍या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड करण्यासाठी १४ डिसेंबरपर्यंत मुदत असेल. ई-स्‍क्रुटीनी प्रक्रिया राबविण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत राहील. तात्‍पुरती गुणवत्ता यादी १७ डिसेंबरला जारी केली जाईल. यासंदर्भातील हरकती नोंदविण्यासाठी १८ व १९ डिसेंबर अशी मुदत असेल. अंतीम गुणवत्ता यादी २१ ला प्रसिद्ध केली जाणार असून, पहिल्‍या कॅप राउंडसाठी पर्याय नोंदविण्यासाठी २२ ते २४ डिसेंबरची मुदत असेल. या फेरीतील निवडीचा तपशील २७ डिसेंबरला जारी केला जाणार असून विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी २८ ते ३० डिसेंबर अशी मुदत उपलब्‍ध असेल.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com