
लासलगाव । वार्ताहर Lasalgaon
मुंबईकडे जाणार्या जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्याने शुक्रवारी (दि.2) असंख्य प्रवाशांचे हाल झाले. तब्बल दोन तासांनंतर इंजिन सुरू झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत भरउन्हात प्रवाशांचे मोठे हाल झाले. तर मनमाडहून मुंबईकडे जाणार्या रेल्वेगाड्या उशिराने धावत होत्या.
जालन्याहून निघालेल्या जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे इंजिन सकाळी लासलगाव-निफाड स्थानकादरम्यान फेल झाले. त्यामुळे इंजिन दुरूस्त होईपर्यंत सकाळी साडेअकरापासून दुपारी दीडपर्यंत म्हणजे दोन तास गाडी लासलगाव-निफाड रेल्वेस्थानकादरम्यान उभी होती. बेजबाबदार रेल्वे प्रशासनामुळे ऐन उन्हाळ्यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
दोन तासात रेल्वेने कोणतीही सूचना प्रवाशांना दिली नाही. यामुळे मनमाडहून मुंबईकडे जाणार्या सर्व प्रवासी गाड्या उशिराने धावत होत्या. दुपारी दोनच्या सुमारास इंजिनमधील बिघाड दुरूस्त झाल्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, निफाड रेल्वेस्थानकावर थांबा असलेल्या रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करत असलेल्या असंख्य प्रवाशांना ताटकळत बसावे लागले. थोडावेळ प्रवाशांनी हा प्रकार सहन केला. मात्र एक-दीड तास झाल्यानंतरही गाडी उभीच असल्याने प्रवासी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
सध्या उष्णतेचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून बचाव करावा लागत आहे. त्यातच जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.