त्र्यंबकेश्‍वर नव्हे, अतिक्रमणांची नगरी...!

बहुतांश बांधकामे अनधिकृत; पदाधिकार्‍यांची मिलीभगत
त्र्यंबकेश्‍वर नव्हे, अतिक्रमणांची नगरी...!

नाशिक | Nashik

पौराणिक महत्त्व असलेल्या व धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्र्यंबकेश्‍वर शहरात प्रत्येक शासकीय जागांवर, रस्त्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. यामध्ये सर्वसामान्य टपरीधारकापासून मोठ्या उद्योजक, व्यावसायिक व विकसकांसहीत नगरसेवकांनीही अतिक्रमणे केली आहेत.

या सर्वांना अधिकारी अर्थपूर्ण मदत करत असल्याने त्र्यंबकेश्‍वर धार्मिक नगरीबरोबरच अतिक्रमणांची नगरी म्हणून ओळखली जात आहे.

त्र्यंबकेश्‍वरला नव्याने दाखल झालेले प्रांतधिकारी शुभम गुप्ता यांनी शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. ८ मार्च रोजी ही मोहीम सुरू होत असल्याने त्र्यंबकेश्‍वरमधील अतिक्रमणांचा विषय ऐरणीवर आला आहे.

तीनही बाजूंनी पर्वत असल्याने मध्यापासून पावणेदोन किलोमीटरपर्यंत विस्तार असलेेल्या या नगरीत मुळातच जागा कमी आहे. गोदावरी नदी, कुशावर्त ते त्र्यंबकेश्‍वर मंदिर या मध्यवर्ती भागात तसेच त्याच्या बाजूच्या पुरातन मंदिरांची व जमिनींची मालकी पुरातत्त्व विभागाकडे आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या नावे शासकीय भूखंड २७ तर नगरपालिकेचे २५ भूखंड आहेत. त्याच्या बाहेर सर्व बाजूंनी आखाड्यांच्या जमिनी असून त्या डोंगरावरपर्यंत आहेत. त्या संपल्यानंतर वनविभागाची हद्द सुरू होते. या सर्वांमध्ये त्र्यंबकेश्‍वर नगरी वसली आहे. तीनही बाजूंनी डोंगर असल्याने विस्तारास संधी नाही. अशातही पुढील विकास आराखडा मांडण्यात येऊन अगदी तो डोंगरांवरही विस्तारण्यात आला आहे.

मुळात त्र्यंबकेश्‍वर नगरात जागेची कमतरता असल्याने व खासगी जमिनीही मर्यादित असल्याने उर्वरित शासकीय जमिनींवर अतिक्रमण करूनच मोठ्या प्रमाणात वसाहती वाढत आहेत. व्यावसायाच्या दृष्टिकोनातून त्र्यंबकेश्‍वर मंदिर मध्यवर्ती ठेवून तसेच बसस्थानक, वाहनतळ येथून मंदिराकडे जणारे रस्ते समोर ठेवून व्यावसायिक जागा बळकावत आहेत. यामुळे पुरातत्त्व विभागाची, शाही मिरवणुकीचे मार्ग अतिक्रमणांच्या विळख्यात आहेत.

मोक्याचा जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी शहरात मोठी चढाओढ असून यामध्ये धनदांडगे व्यावसायिक व नगरसेवक आघाडीवर आहेत. शहरातील नगरपालिका तसेच शासकीय जागांवर त्यांचे अतिक्रमण आहे अथवा त्यांनी नगरपालिकेसह पुरातत्त्व अगर कोणत्याही विभागाची परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे केली आहेत. ही बांधकामे कशी अधिकृत आहेत हे दाखवण्यासाठी या सर्वांचा आटापिटा सुरू आहे.

या सर्व बाबी नगरपालिकेच्या विशेष अधिकारी तसेच सर्व अधिकार्‍यांना दिसत नाहीत की त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे हे सर्वशृत आहे. सर्वांची मिलीभगत असून एकमेकांना वाचवण्यासाठी नगरपालिका सभेत धडाधड निर्णय घेतले जात आहेत. त्यांना विरोध झाल्यास मागच्या दाराने ते सभेच्या इतिवृत्तात घुसवले जात असल्याचे नागरीक बोलत आहेत.

कुंपणच शेत खाते

त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेत निवडून आलेल्या बहुतांश नगरसेवकांचीच अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे असल्याचे समोर आले आहे. त्यांच्याविरोधात चंद्रकांत पाठक यांनी न्यायालयात तक्रार केली असून १८ नगरसेवक पदाचा गैरवापर करत असल्याने त्यांची पदे काढून घेण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असले तरी या सर्वांवर कारवाईची टांगती तलवार आहे. दोन वर्षांपूर्वीच यातील एका नगरसेवकाचे पद गेल्याचेही वास्तव समोर आहे.

गरिबांच्या घरावर कारवाया

त्र्यंबकेश्‍वरमध्ये अतिक्रमणांविरोधात काही सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवतात. यातून न्यायालयापर्यंत प्रकरणे जाऊन कारवाईचे आदेश झाले आहेत. तसेच कुंभमेळा व यात्रेच्या निमित्ताने अतिक्रमणे काढण्याचा निर्णय होतो आणि अडचण ठरणारी खरी अतिक्रमणे तशीच ठेवून दूर असलेल्या झोपडपट्ट्या, गरिबांच्या टपर्‍या, हातगाडे, तक्रारदारांची घरे यावर बुलडोजर फिरवला जातो. तर पक्क्या बांधकामांच्या केवळ पायर्‍या अथवा एखादा बोर्ड, पन्हाळ इतकेच अतिक्रमणात काढले जात असल्याची परंपरा असल्याचे बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com