मालेगाव नामा: ‘अतिक्रमण’मुक्त शहरासाठी कठोर व्हावे लागेल

मालेगाव नामा: ‘अतिक्रमण’मुक्त शहरासाठी कठोर व्हावे लागेल

मालेगाव । हेमंत शुक्ला | Malegaon

अस्वच्छता, रोगराई व वाहतूक कोंडी (Traffic jam) या त्रिसुत्रीचे जनक ठरलेल्या रस्त्यांसह गटारी व नाल्यांवरील अतिक्रमणांवर (Encroachments) अखेर मनपा प्रशासनाची वक्रदृष्टी पडल्याने ते जमीनदोस्त होवू लागले आहे.

यासाठी निमित्त ठरले पहिल्या-वहिल्या पावसाच्या पाण्याने शहर तुंबण्याचे. प्रमुख रस्त्यांसह गटारी (Gutters) व नाल्यांवरील तसेच प्रवेशव्दार, वीजखांब व वृक्षांच्या आडोशास असलेली अतिक्रमणे (Encroachment) या मोहिमेंतर्गत जेसीबीच्या (JCB) सहाय्याने उध्वस्त केली जात आहे. प्रशासक तथा आयुक्त भालचंद्र गोसावी (Administrator and Commissioner Bhalchandra Gosavi) यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगण्याचे स्पष्ट निर्देश दिले असल्याने अवघ्या 16 दिवसात 2 हजार 841 पेक्षा अधिक अतिक्रमणे नेस्तनाबूत करण्यास मनपा पथकास यश आले आहे.

अतिक्रमण मुक्तीमुळे गटारी, नाल्यांसह रस्ते देखील मोकळा श्वास घेत असल्याने या मोहिमेचे जनतेकडून उत्स्फुर्त स्वागत केले जावून समाधान व्यक्त होत असल्याचे दिसून आले आहे. राजकीय वरदहस्ताने थाटलेली अतिक्रमणे (Encroachment) जनतेसाठी मात्र त्रासदायक ठरली होती. त्यामुळे मनपा प्रशासनाच्या या मोहिमेस पुरेसे पोलीसबळ मिळालेले नसतांना देखील जनतेचे समर्थन असल्याने कुठलाही अनुचित प्रकार गत 16 दिवसात घडू शकलेला नाही हे विशेष म्हणावे लागेलच. तसेच शहरवासिय अतिक्रमणांच्या विरोधात असल्याचे देखील स्पष्ट करणारे ठरले आहे.

एकिकडे मोहिमेस यश मिळत असतांना दुसरीकडे मात्र रस्ते, गटारी व नाले हे जणू आपल्याच मालकीचे अशी मानसिकता बनलेल्यांनी मनपा पथक दुसर्‍या भागात जाताच पुन्हा अतिक्रमण (Encroachment) थाटण्यास प्रारंभ केला आहे. या संदर्भात आता जनतेकडून देखील तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पुन्हा अतिक्रमण केले गेल्यास मनपा मोहिमेच्या यशस्वीतेबरोबर प्रामाणिकतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरणार आहे.

पुन्हा अतिक्रमण होवू लागल्याचे गंभीरतेने दखल घेत प्रशासक भालचंद्र गोसावी (Administrator Bhalchandra Gosavi) यांनी पुन्हा अतिक्रमण करणार्‍यांविरूध्द दंड, सामान जप्तीसह फौजदारी गुन्हा (Criminal offense) दाखल करण्याचा इशारा दिला आहे. आयुक्त गोसावींनी ज्या निडरतेने कुठल्याही दडपणास न जुमानता अतिक्रमण मोहिम राबविली आहे. तसाच पवित्रा या मोहिमेला पुन्हा अतिक्रमण करत आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या विरूध्द कठोर कारवाईव्दारे घ्यावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्त काय भुमिका घेतात याकडे संपुर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

यंत्रमागाचे मँचेस्टर, रंगीन साडीचे माहेरघर अशी या शहराची देश-विदेशात ओळख असली तरी संवेदनशील, अस्वच्छता व अतिक्रमणांनी व्यापलेले शहर अशी कुप्रसिध्दी देखील चर्चेत आहे. मोकळ्या भुखंडांसह रस्त्यांवर गटारी व नाल्यांवर छोटीमोठी दुकाने, घरे, प्रसाधनगृह बांधणे हा जणू आपला जन्मसिध्द अधिकार आहे या भावनेतून ही अतिक्रमणे येथे थाटण्यात आली आहे.

शहरातील एकही रस्ता किंवा मनपा मोकळा भुखंड अतिक्रमणमुक्त राहिलेला नाही. इतकेच काय बहुतांश गटारी व नाल्यांचे अस्तित्व सुध्दा या अतिक्रमणांखाली लपले गेले आहे. मतांच्या बेगमीसाठी राजकीय नेत्यांतर्फे अतिक्रमणांना अप्रत्यक्षरित्या असलेले समर्थन व कायदा सुव्यवस्था राखण्याच्या भितीपोटी मनपा-शासन यंत्रणेने केलेले दुर्लक्षच या शहरास अतिक्रमणाच्या विळख्यात टाकण्यासाठी कारणीभूत असल्याचे म्हटल्यास चुकीचे ठरणारे नाही.

रस्ते, गटारी, नाले, मोकळे भुखंड असो की विजेचे खांब, वृक्ष अथवा कमानींचा आडोसा असो जिथे जागा मिळेल तिथे अतिक्रमण थाटण्यात आले आहे. यामुळे गटारी, नाले स्वच्छ करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य राहत असल्याने बाराही महिने साथीचे रोग येथे ठान मांडून असतात. अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी लहान असो की मोठे सर्वच रस्त्यांच्या पाचवीला पुजलेली. किदवाईरोड, पेरी चौक, मुल्लावाडा, कुसूंबारोड, जुना आग्रारोड, मच्छिबाजार, कॅम्परोड आदी प्रमुख भागातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीमुळे सातत्याने अपघातांच्या घटना घडत असून काहींना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना जायबंदी देखील व्हावे लागले आहे.

अतिक्रमणांमुळेच अस्वच्छता, रोगराई व वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असल्याची जाणीव प्रशासन यंत्रणेस होती. मात्र कारवाई करणे टाळले जात होते. माजी आ. व महापौर राहिलेल्या शेख रशीद यांनी प्रशासन यंत्रणा अतिक्रमण काढण्यास टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा काही दिवसांपुर्वी दिला होता. राजकीय दबावातूनच अतिक्रमणांविरोधात कारवाई होत नसल्याची टिका सर्वथरातून त्यामुळेच केली जात होती. अतिक्रमण धारकांना असलेला राजकीय आश्रय या मोहिमेस नेहमीच अडथळा ठरत राहिला आहे.

पहिल्याच पावसाने ंसंपुर्ण शहरात पाणी तुंबल्याने नागरीकांनी तीव्र संताप व्यक्त केला. आयुक्त गोसावी यांनी पाणी तुंबलेल्या भागांची पाहणी केली असता रस्त्यांसह गटारी व नाल्यांवरील अतिक्रमणांमुळे स्वच्छतेस अडथळा ठरत असल्याने पाणी तुंबल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे रस्त्यांसह गटारी व नाले जोपर्यंत अतिक्रमणमुक्त होत नाही तोपर्यंत ही समस्या दूर होणारी नव्हती.

शासनाने 14 जुनरोजी मनपा सभागृह बरखास्त करत मनपावर प्रशासक नियुक्त केले. सुदैवाने आयुक्त गोसावींचीच प्रशासकपदी वर्णी लागली. राजकीय अडथळे दूर झाल्याने आयुक्त गोसावी यांनी प्रशासकपदाचा पदभार स्विकारताच 48 तासांचा अल्टीमेटम अतिक्रमण काढण्यासाठी संबंधितांना दिला. मात्र हा इशारा देखील दुर्लक्षित केला गेल्याने 17 जुनपासून आयुक्त गोसावी यांच्या आदेशानुसार अतिक्रमण काढण्याच्या धडक मोहिमेस प्रारंभ केला गेला.

शहरातील चारही प्रभागात अतिक्रमण निर्मुलन मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी दोन पथकांची नियुक्ती केली गेली. आयुक्त गोसावी यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त सतिष दिघे, सहाय्यक आयुक्त सुनिल खडके, लेखाधिकारी राजू खैरनार, अतिक्रमण अधिक्षक शाम कांबळे आदी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम गत 16 दिवसापासून अखंडीतपणे राबवली जात आहे. आजअखेर 2 हजार 841 अतिक्रमणे काढण्यात मनपा पथकांना यश आले आहे.

कुणाचाही मुलाहिजा न बाळगता मनपा प्रशासन कारवाई करत असल्याने या मोहिमेचे जनतेत सर्वथरातून कौतुक केले जात आहे. आयुक्त गोसावी यांनी घेतलेली कणखर भुमिका निश्चित शहराच्या हिताची ठरली आहे. मात्र हे शहर समस्यामुक्त होवू नये अशी मानसिकता असलेल्यांनी पुन्हा अतिक्रमण थाटण्यास प्रारंभ केल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरू लागली आहे.

मनपा प्रशासनाच्या मोहिमेलाच आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे आयुक्त गोसावी यांनी शहर समस्यामुक्त होण्यासाठी पुन्हा अतिक्रमण थाटणार्‍यांविरूध्द सामान जप्तीच नव्हे तर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई विनाविलंब केली पाहिजे. तसेच या मोहिमेसाठी लागलेला खर्च देखील संबंधितांकडून वसुल केला पाहिजे. तरच हे शहर अतिक्रमणमुक्त होवू शकेल, अशी येथील जनतेची अपेक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com