प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

प्रकाशक, ग्रंथविक्रेत्यांचा उत्साहवर्धक प्रतिसाद

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक येथे होणार्‍या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला 94th All India Marathi Literary Convention अत्यंत उत्साह व आश्वासक प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रकाशक आणि ग्रंथ विक्रेते,Publishers and booksellers, तसेच प्रतिनिधी नोंदणीसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून विचारणा सुरु झाली आहे. दिवाळीनंतर गेल्या 3 दिवसांत आतापर्यंत 105 स्टॉल्स्चे बुकींग झालेे आहे.

नोंदणीलाही वेग आला आहे. संमेलनानिमित्ताने विविध समित्याही कार्यरत झाल्या असून आपापल्या कामाची आखणी करण्यात मग्न झाले आहेत. संमेलनात ग्रंथ प्रदर्शन हे मोठे आकर्षण असते. संमेलन स्थगित झाल्यानंतर काही प्रकाशकांनी व ग्रंंथ विक्रेत्यांनी आपली नोंदणी मागे घेतली होती.

तरीदेखील 54 ग्रंथ स्टॉलधारकांनी आपली नोंदणी कायम ठेवली होती. संमेलनाच्या तारखा जाहीर होताच इतरांनीही चौकशीला सुरुवात केली. दिवाळीनंतरच्या गेल्या 3 दिवसांत आतापर्यंत एकूण 105 स्टॉल्स्चे बुकींग झालेे आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, वाशिम, नागपूर, कोल्हापूर, पुसद, जळगाव, नांदेड, परभणी, यवतमाळ आदी ठिकाणंचे ग्रंथविक्रेते सहभागी झाले आहेत.

संमेलनात ‘प्रकाशन कट्टा’ हेही एक महत्वाचे केंद्र व आकर्षण असणार आहे. त्यात महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्र ग्रंथांचे 50 खंड प्रकाशित होणार आहेत. त्यासाठी राजमाता शुभागिंनीराजे गायकवाड, बडोदा यांनी आपण उपस्थित राहणार असल्याचे संमेलन कार्यालयाला कळवले आहे. उच्च माध्यमिक व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतदेखील यावेळी उपस्थित राहतील. ज्या प्रकाशकाला आणि किंवा लेखकांना आपल्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन संमेलनकाळात करण्याची इच्छा असेल त्यांनी संमेलन कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संमेलनाच्या प्रतिनिधी नोंदणीस पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र येथून नोंदणी करण्यास साहित्य रसिकांनी सुरुवात केली आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जाहिरातदार, देणगीदार आणि हितचिंतक सक्रीय झाले आहेत. सारस्वत सहकारी बँकेचे अध्यक्ष .गौतम ठाकूर आणि नाशिकचे उद्योगपती व बॅकेंचे संचालक हेमंत राठी यांनी भरीव सहकार्य व सहाय्य देण्याचे आश्वासन दिले आहेे.

‘कालिदास कलामंदिरा’ मध्ये कार्यालय

संमेलनाचे कार्यालय कालीदास कलामंदिराच्या पहिल्या मजल्यावर तालीम हॉलमध्ये सुरु झाले आहे. सकाळी 10 पासून पुढे दिवसभर चालू राहिल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि संमेलन यशस्वी होण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन कार्यवाह सुभाष पाटील यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com