नाशिक विभागात तेराशे बेराेजगारांना रोजगार

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे प्रयत्न
महास्वयंम
महास्वयंम

नाशिक | Nashik

कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या प्रयत्नातून नाशिक विभागात एप्रिल २०२१ मध्ये १ हजार ३०२ बेराेजगारांना नाेकरी मिळाली आहे. तर राज्यात ८ हजार २५९ जणांना रोजगार मिळाला आहे.

महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे नोकरीइच्छुक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.

यातून गेल्यावर्षी १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते एप्रिलअखेर ५२ हजार १६९ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी विभागाने वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात.

त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.

एप्रिलमध्ये विभागाकडे मुंबई विभागात ५ हजार ८०९, नाशिक- २ हजार ७५७, पुणे - ४ हजार ९९७, औरंगाबाद - ३ हजार ३७०, अमरावती विभागात १ हजार १४४ तर नागपूर विभागात ९७८ इतक्या नोकरीइच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी केली.

एप्रिलमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ८ हजार २५९ उमेदवार नोकरीला लागले. यामध्ये मुंबई विभागात ३ हजार ९९५, नाशिक- १ हजार ३०२, पुणे- १ हजार ७५७, औरंगाबाद- ८६९, अमरावती - ३१४ बेरोजगार उमेदवार नोकरीला लागले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com