एसटी महामंडळ
एसटी महामंडळ
नाशिक

एसटी कर्मचारी तणावाखाली; महामंडळाकडून वेतन थकले

पगार नसल्याने एकाची आत्महत्या

Bharat Pagare

नाशिक | Nashik

कराेना संकट आणि त्यामुळे केलेल्या लॉकडाउनचा सर्वच क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. राेज मिळणाऱ्या काेट्यवधींच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठीही एसटीकडे पैसे नसल्याचे समोर येते आहे. जुलै महिना संपल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनाची प्रतिक्षा कायम आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यांतर्गत वाहतुकीला परवानगी दिली असली तरी लालपरीकडे प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. एसटी कर्मचारी जोखीम पत्करून रेड झोन व बिगर रेड झोनमधून प्रवाशांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करीत आहेत. नियमित वेतन मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले असून, त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीचा वेळी आली आहे. दरम्यान, करोनाच्या काळात राज्य शासनाकडून सवलत मूल्यापोटी प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळास प्राप्त झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येत आहे. उत्पन्नच मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे आव्हान एसटी प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. जून महिन्याच्या वेतनासाठी शासनाकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.

एसटी महामंडळाकडील सवलत व अन्य प्रतिपूर्तीचीही रक्कम संपली आहे. त्यामुळे राज्य शासनानकडून पाचशे ते हजार काेटी रूपये मिळाल्यास कर्मचाऱ्यांचे पगार हाेऊ शकतात, अशी माहिती एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिली आहे.

तीन चार दिवसांत पगार

परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. बैठकीत एसटी महामंडळाला २००० कोटी रुपये अर्थसहाय्य देण्याबद्द्ल चर्चा झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी लागणारी रक्कम त्वरित महामंडळाला देण्यात येईल. त्यामुळे येत्या तीन-चार दिवसाच्या आत एसटी कर्मचाऱ्यांना पगार अदा करण्यात येणार असल्याचे कळते.

पगार नसल्याने आत्महत्या

काम बंद आणि पगार वेळेत मिळत नसल्याने नैराश्यातून एसटी महामंडळातील मॅकेनिकने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल धोंडिराम माळी (वय- ३५, रा. पेठ, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. माळी हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आगारात कार्यरत होते.

Deshdoot
www.deshdoot.com