नाशिक । प्रतिनिधी

नाशिक कार्यालयातुन पुण्यातील आयजीआर कार्यालयाकडे नेण्यात येणार दस्त चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधीत कर्मचार्याला तत्काळ निलंबीत केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. दरम्यान, आयजीआरचे पथक नाशकात दाखल झाले असून त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे.

देवळा तालुक्यात बनावट मुद्रांकांवर खोटे दस्तऐवज तयार करून शेतजमिनीचा व्यवहार केल्याचा प्रकार अलीकडेच उघडकीस आला आहे. याशिवाय जिल्ह्यात मालेगावसह अन्य काही ठिकाणी देखील अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत.

या पार्श्वभुमीवर तब्बल 40 हजार दस्त तपासून घेण्याचे काम सुरूच असताना आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयातील काही महत्वपुर्ण कागदपत्रे पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे (आयजीआर) घेऊन जात असताना चोरीला गेल्याचा अजब प्रकार पुढे आला आहे. कारची काच फोडून ही कागदपत्रे चोरीस गेल्याचे संबंधित कर्मचायाकडून सांगण्यात आले.

दस्त गहाळ प्रकरणाचा तपास सुरु असून ते न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे सध्या या विषयावर काहीही बोलणे उचित ठरणार नाही.

कैलास दवंगे, मुद्रांक जिल्हाधिकारी नाशिक