अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू
नाशिक

अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू

‘शुल्क नोंदणी ऑनलाइन’

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

अकरावीच्या केंद्रीयकृत प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यंदा करोना संकटामुळे शुल्क नोंदणीदेखील ऑनलाइन असणार आहे. तसेच सर्व प्रकारची कागदपत्रे ऑनलाइन स्वरुपातच जमा करावी लागणार आहेत. २६ जुलैपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असून, तत्पूर्वीच ‘ओटीपी’, जन्म दिनांक, आधार कार्ड क्रमांक, डेबिट व क्रेडिट कार्ड क्रमांक कोणालाही न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण विभागातर्फे कोणत्याही सेवकाकडून किंवा कॉलेज प्रशासनातर्फे ओटीपी मागितला जाणार नाही. त्यामुळे सर्वांनी दक्ष राहावे. फसगत होत असल्याचे वाटल्यात थेट उपसंचालक कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने केले आहे.

शिक्षण उपसंचालक कार्यालयाने काही सूचना अकरावी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात केल्या आहेत. त्यानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी इ-माहिती पुस्तिका व्यवस्थित वाचावी. प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावी प्रवेशासाठी केवळ एकच अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे वेळीच स्कॅन करून ठेवावीत. 1 एमबीपेक्षा जास्त साइज नसावी. मॅनेजमेंट, इन-हाउस व अल्पसंख्यांक कोट्यातील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्जाचा भाग-1 भरणे अनिवार्य असल्याचे शिक्षण उपसंचालक विभागाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाची कागदपत्रे

खुला संवर्ग : दहावीचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा मूळ दाखला

आरक्षित संवर्ग : दहावीचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा मूळ दाखला, जातीचा दाखला, ओबीसी, एनटी, एसबीसी संवर्गासाठी नॉन क्रिमीलेअर दाखला

समांतर आरक्षण : दहावीचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, विशेष आरक्षण प्रमाणपत्र

हे लक्षात ठेवा

विद्यार्थ्यास नियमित फेरीत त्याने अर्जाच्या भाग-२ मध्ये नमूद केलेल्या पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाल्यास, त्या कॉलेजमध्ये पूर्ण शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. अन्यथा, पुढील फेरीसाठी विद्यार्थ्याचे नाव प्रतिबंधित करण्यात येते.

गुणवत्ता यादीत नाव आल्यास दिलेल्या मुदतीत कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. अन्यथा, कॉलेजतर्फे विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारला जाईल.

अर्जाच्या भाग-2 मध्ये विद्यार्थी एकाच विद्याशाखेची निवड करु शकेल. प्रत्येक फेरीपूर्वी विहित कालावधीत विद्यार्थी भाग-2 मध्ये विद्याशाखा व कॉलेजांच्या पसंती क्रम बदलू शकतो.

पसंती क्रम भरताना विद्यार्थी व पालकांनी कॉलेजांचा प्रकार, शुल्क, अनुदानाचा प्रकार, माध्यम, उपलब्ध विषय, प्रवेशाची क्षमता, मागील वर्षाचा कट-ऑफ, प्रवासाचे अंतर याबाबत विचार करून पसंती क्रम द्यावा.

यांचे प्रवेश ऑफलाइन

गृहविज्ञान, नाइट ज्युनिअर कॉलेज, तांत्रिक ज्युनिअर कॉलेज, सैनिकी कॉलेज, अन्य मंडळाचे कॉलेज यांचे प्रवेश त्यांच्या कॉलेजस्तरावर होतील. विद्यार्थ्यांची त्याची नोंद घेऊन प्रवेशासंदर्भात कॉलेजांचा पसंतीक्रम नोंदवावा

Deshdoot
www.deshdoot.com