कोणत्या गुणवत्तेवर अकरावीचे प्रवेश?

कोणत्या गुणवत्तेवर अकरावीचे प्रवेश?

नामांकित महाविद्यालयांसाठी होणार चुरस

नाशिक । प्रतिनिधी

यंदा अकरावीचे प्रवेश कोणत्या गुणवत्तेवर दिले जावेत याबाबत मोठा पेच निर्माण होऊ शकतो. सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्याने इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत तांत्रिक अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

नाशिकमध्ये सीबीएसई मंडळातून दहावी उत्तीर्ण होणारे काही विद्यार्थी राज्य मंडळाच्या ज्युनिअर कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी अर्ज करतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणत्या गुणवत्तेच्या निकषांवर प्रवेश दिला जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सीबीएसईने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

मात्र राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सीबीएसईतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या निकालाशी सहमत नसलेल्या विद्यार्थ्यांना करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा देता येणार आहे. मात्र या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे सीबीएसई निकालाच्या नव्या फॉर्म्युल्याच्या आधारावर हे विद्यार्थी यंदा अकरावी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतील.

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होणार्‍या सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण असतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अकरावीसाठी नामांकित ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो, असे सांगितले जाते. मात्र यंदा सीबीएसईची परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्या मूल्यमापन पद्धतीद्वारे गुण देण्यात येतील, याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध नाही.

त्यातच यातून विद्यार्थ्यांना मिळणारे गुण वाढतील की कमी होतील, याबाबतही शंका आहे. राज्य मंडळदेखील इयत्ता दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पद्धतीने दोन्ही मंडळांचे गुण जाहीर झाल्यास नामांकित महाविद्यालय मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com