‘आरटीई’ चे अकराशे प्रवेश निश्चित
नाशिक

‘आरटीई’ चे अकराशे प्रवेश निश्चित

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने (आरटीई) खासगी शाळांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्याचे बंधन घालून देण्यात आले आहे. त्यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार १२६ प्रवेश निश्चित झाले आहेत. तर २ हजार ३७७ विद्यार्थ्यांना तात्पुरते प्रवेश देण्यात आले आहे.

फेब्रुवारी २०२० मध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती. जिल्ह्यातील ४४७ शाळांमध्ये आरटीई प्रवेशासाठी ५५०० जागा उपलब्ध असून, सुमारे १७ हजार ६३० अर्ज प्राप्त झाले होते. १७ मार्चला ऑनलाइन सोडत काढण्यात आली होती. सोडतीत जे विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत, त्यांच्या पालकांना मोबाइलवर प्रवेशाचा मेसेज प्राप्त झाला होता. त्यानंतर प्रवेशप्रक्रिया थंडावली होती.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेशांच्या नियमांत काही बदल करण्यात आले आहेत. प्रवेशास पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ‘एसएमएस’द्वारे माहिती दिली जात आहे. शाळेत गर्दी होऊ नये म्हणून ठराविक पालकांनाच प्रवेशासाठी बोलाविले जात आहे.

जूनच्या अखेरच्या आठवड्यात प्रवेश प्रक्रिया धीम्या गतीने सुरु होती. मात्र, जुलैपासून शाळांनी वेग दिल्याने प्रवेश निश्चित करण्याचा आकडा वाढला आहे. दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांत एकूण जागांपैकी वीस टक्के जागांवर प्रवेश देण्यात आले आहे. जुलै अखेपर्यंत प्रवेशाचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com