स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोनांबेत पोहचली वीज

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच कोनांबेत पोहचली वीज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

वर्षानुवर्षे अंधारात चाचपडणाऱ्या इगतपुरीतील कोनांबे येथील गुढा वस्तीवर कोजागिरीच्या रात्री विजेचे दिवे पहिल्यांदाच चमकले आणि स्थानिक आदिवासींच्या चेहऱ्यावरील अंधार दूर होऊन त्यांच्या जीवनात प्रकाश पेरला गेला. स्वातंत्र्यानंतर प्रथमच घरात विज आल्याने येथील नागरिकांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान दिसत होते.

कोनांबे येथील गुढा वस्तीमध्ये कोजागिरीच्या रात्री तब्बल अडीच तीन किलोमीटर अंतरावरून ३२ विजेचे खांब टाकून तेथे वीज देण्यात आली. महावितरणच्या 'ओटीएसपी' योजनेतून सरपंच संजय डावरे यांच्या प्रयत्नातून काळोखात बुडालेली ही वस्ती अखेर प्रकाशमय झाली. गावापासून डोंगरदऱ्यामध्ये ५ किलोमीटर अंतरावर असलेली गुढावस्ती भागात १२ कुटुंब वास्तव्यास असून 'कसेल त्याची जमीन' या तत्वावर येथील आदिवासींना वन वनपट्टे देण्यात आले आहेत.

स्वातंत्र्यापूर्वी पासून येथे तीन ते चार कुटुंब वास्तव्यास आहेत. तर काही कुटुंब गेल्या ३०-४० वर्षापासून येथे राहतात. मात्र या भागात लाईटच पोहोचली नसल्याने आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत होती. शासनाकडून रॉकेल मिळत होते, तोपर्यंत त्यांचे दिवे तेवत होते. रॉकेल बंद झाल्यावर मात्र भलतीच पंचाईत झाली. महागड्या दराने डिझेल घेऊन किंवा गोडेतेल वापरुन त्यावर दिवे पेटवावे लागे. संध्याकाळी जेवण होईपर्यंत हे दिवे तेवत. त्यानंतर दिवे बंद होताच काळ्याकुट्ट अंधारात वस्ती गुडुप होत.

मोबाईल, टीव्ही नसल्याने जगापासून ते कोसो दूर होते.वीज अभावी अंधारात वन्य प्राणी यांची भीती कायम उराशी खुणवत असतांना तरी दैनंदिन जीवनाची गाडी येथील आदिवासी बांधव बिंधास्त चालवत होती. आता मात्र या नागरिकांची वीज समस्या कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. सध्या सिंगल फेजच्या माध्यमातून येथील ७ कुटुंबांना मीटर देण्यात आले असून उर्वरितांनाही लगेच मीटर देण्यात येणार आहे. तसेच थ्री फेजची तरतूद करून शेतीसाठी ही वीज उपलब्ध करून देण्याचा मानस सरपंच संजय डावरे यांनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com