नवीन नाशिक । Nashik

पाथर्डी फाटा येथे प्रणव हाईट्स अपार्टंमेंट मध्ये वाय-फायचे केबल टाकत असताना अति उच्च दाब असलेल्या विद्युत वाहिनीला संपर्क झाल्याने केबल कर्मचारी जखमी झाला.

अपार्टमेंटमधील रहिवाशांचे घरगुती उपकरणे जळाली तर परिसरात मोठा आवाज झाल्याने रहिवाशी घाबरले. अतिउच्च दाबाची वीज वाहिनी सातपूर एमआयडीसीत जात असल्याने त्या ठिकाणीही काही कंपन्यांमधील विद्युत पुरवठा काही वेळ बंद झाल्याचे विद्युत अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाथर्डी फाटा येथे प्रणव हाईट्स या पंचवीस फ्लॅटधारक असलेल्या बिल्डिंगमध्ये वाय फाय केबल कनेक्शन टाकण्याचे काम एक कर्मचारी गच्चीवर करत असताना त्याने फेकलेल्या केबलचा संपर्क इमारती जवळून गेलेल्या अतिउच्च दाबाच्या वीज( 132 केबी )वीज वाहिनी सी आल्याने मोठा आवाज झाला. या घटनेमध्ये काम करीत असलेला भुसारे नावाचा कर्मचारी भाजला गेला.

सदरील बाब येथील सोसायटीचे असलेले चेअरमन सुधाकर घोडके यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ सदर कर्मचाऱ्यास वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी फाटा येथे दाखल केले. केबल चालकाने अपार्टमेंटमधील परवानगी न घेताच परस्पर काम केल्याचे सेक्रेटरी व चेअरमन यांनी सांगितले. सदरील घटने मुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी रहिवाशांच्या घरांमधील इलेक्ट्रिक फिटिंग, बोर्ड, फॅन तर काहींचे फ्रिज व टीव्ही खराब झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.

इमारतीच्या वरील बाजूला या धक्क्यामुळे मोठा तडा गेल्याचेही दिसून आले. केबल चालक ठेकेदाराचा असलेला बेजबाबदारपणा यास कारणीभूत असल्याने त्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी ही रहिवाशांनी केली आहे. सदरील ठिकाणी विद्युत कर्मचारी व अधिकारी दाखल झाले होते.