मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकार्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पारदर्शीपणे कामकाज करावे असे निर्देश तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकार्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नायब तहसिलदार सोमनाथ खैरे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून मालेगाव तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीचे कामकाज करतांना दाखल उमेदवारी अर्जांची काटेकोर छाननी करावी. यामध्ये उमेदवाराकडे असलेली थकबाकी, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता, शौचालय, कुटूंब नियोजन, अतिक्रमण आदी बाबीची काटेकोर तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश तहसीलदार राजपूत यांनी दिले.

ग्रामपंचायतींमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांची नामनिर्देशन अर्जासमवेत समितीकडे जाती दावा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती विहीत मुदतीत सादर करता येणार असल्याचेही राजपूत यांनी शेवटी बोलतांना सांगितले.