सोमठाणे सोसायटीची निवडणूक संशयास्पद ?

‘जनसेवा’ पॅनलचे उमेदवार भारत कोकाटे, अरुण कोकाटे यांचा आरोप
सोमठाणे सोसायटीची निवडणूक संशयास्पद ?

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील सोमठाणे (Somthane) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या (Executive Service Cooperative Society) रविवारी (दि.19) पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणूकीत (election) 48 मतपत्रिका बाद ठरवण्यात आल्या असून या मतपत्रिकांसह एकूण मतमोजणी प्रक्रियाच संशयास्पद (counting process itself is questionable) असल्याचा आरोप गावचे सरपंच व ‘जनसेवा’ पॅनलचे उमेदवार भारत कोकाटे, अरुण कोकाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.

सर्वसाधारण गटात आठ उमेदवार निवडून द्यायचे असतांना 48 मतदारांनी 9 मते दिल्याने त्यांची मतपत्रिका बाद ठरवण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिला. मात्र, या मतपत्रिका प्रत्यक्षात बघू न देता आतच असलेल्या संगणक ऑपरेटरकडे (Computer operator) पाठवण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील 41 मतपत्रिकांवर 8 मते ‘जनसेवा’च्या उमेदवारांना तर एक मत आ. कोकाटे यांच्या पॅनलमधील एकाच उमेदवाराला पडलेली बघायला मिळाली.

त्यातही 36 मतपत्रिकांवर नववा उमेदवार एकच कसा असू शकतो असा प्रश्न करीत 8 उमेदवारांच्या निशाण्यांवरील शिक्का गडद तर नववा प्रत्येक शिक्का अस्पष्ट उमटला असल्याचा, अर्थात नंतर मारण्यात आला असल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. बाद होणार्‍या सर्व 48 मतपत्रिकांपैकी एकाही पत्रिकेवर दहावे मत मारलेले नाही हेही आश्चर्यकारक असल्याचे त्यात म्हटले आहे.

प्रत्यक्षात 13 जागांसाठी निवडणूक झाली असतांना मतमोजणीच्या वेळी दोन्ही पॅनलचे प्रत्येकी दोन उमेदवार व तीन प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला. त्यासही आक्षेप घेण्यात आला. मात्र, निवडणूक अधिकार्‍याने मनमानी पध्दतीने संपूर्ण प्रक्रिया रेटून नेल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. मतदानासाठी दोन बुथवर दोन मतपेट्या असतांना पहिल्यांदा एका मतपेटीतील मतपत्रिका काढून 25-25 चे गठ्ठे करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी मतपेटीत किती मतपत्रिका आहेत त्या न मोजताच दुसर्‍या मतपेटीतील मतपत्रिका त्यात पुन्हा एकत्र करण्यात आल्या.

मुळात बुथवर झालेल्या मतदानाच्या आकड्याशी मतपत्रिका जुळतात की नाही हे पडताळून पाहण्याची आवश्यकता होती. उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी नोंदवलेल्या आक्षेपांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे पत्रकात म्हटले आहे. बाद मतपत्रिका उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधींना दाखवून त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न न करता, घाई-घाईने संगणक ऑपरेटरकडे (Computer operator) पाठवणे एकूणच मतमोजणी प्रक्रियेबाबत (counting process) संशय निर्माण करणारे आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरु असतांना निवडणूक निर्णय अधिकार्‍याची वर्तणूक अरेरावीची होती.

त्यांना ही प्रक्रिया संपवण्याची नको तेवढी घाई झाली असल्याचे दाखवत होते. मतमोजणीत एक उमेदवार अवघ्या एका मताने व दुसरा उमेदवार 3 मतांनी पराजीत झाल्याचे जाहिर झाल्यानंतर पुर्न मतमोजणीची मागणी निवडणूक निर्णय अधिकार्‍याने फेटाळून लावत आम्हाला आमच्या अधिकारापासून वंचीत ठेवण्यात आल्याचा आरोपही पत्रकात करण्यात आला आहे.

मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपत्रिका मतपेटीत पुन्हा ठेवून मतपेटी सर्व प्रतिनिधींच्या समक्ष सिल करणे व त्यावर साक्षीदार म्हणून दोन्ही पॅनलच्या प्रतिनिधींच्या सह्या घेणे बंधनकारक असतांना कुणालाही न सांगता एक मतपेटी (Ballot box) घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी निघून गेले. एक मतपेटी संस्थेच्या कार्यालयात बेवारसप्रमाणे केवळ सिल करुन ठेवलेली आढळली असली तरी तीच्यावर कुणाच्याही सह्या नाहीत. संस्थेच्या सचिवालाही त्याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. ही संपूर्ण प्रक्रिया घाई-घाईने पूर्ण करुन कुणाला तरी फायदा मिळवून देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍याने आपल्या कर्तव्यात कसूर केली असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला आहे.

बाजार समितीची पुनरावृत्ती?

सोमठाणे सोसायटीत सिन्नर बाजार समितीच्या निवडणूकीचीच पुनरावृत्ती झाल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे भारत कोकाटे सर्वाधिक 253 मते मिळवून विजयी होतात. तर अरुण कोकाटे यांचा केवळ 1 मताने पराभव होतो. त्याचवेळी 48 मतपत्रिका बाद होतात. ज्ञानेश्वर कोकाटे यांचा 8 मतांनी पराभव होतो. विमुक्त जाती भटक्या जमाती गटात घमन गोसावी यांचा केवळ 3 मतांनी पराभव झाला.

मात्र, त्याचवेळी 10 मतपत्रिका बाद ठरवल्या जातात. महिला राखीव गटातही 9 मतांनी ‘जनसेवा’च्या उमेदवाराचा पराभव होतो. मात्र, त्याचवेळी 6 मतपत्रिका बाद ठरतात. प्रत्येक गटातील मतमोजणीच्या वेळी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीशीही मतपत्रिका जुळतात की नाही हे पाहिले गेले नाही. याबाबत वारंवार विचारणा करुनही निवडणूक अधिकार्‍याने त्याकडे डोळेझाक करणे आश्चर्यकारक असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com