नाशिक । Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीला स्थगिती देताच राज्य शासनाने जिल्हा बँकेवर नेमणूक केलेल्या प्रशासकीय मंडळाने मंगळवारी (दि.२३) बँकेत दाखल होत पदभार स्वीकारला.

सुत्रे हाती घेताच प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सहायक आयुक्त एम. ए. आरिफ, मंडळातील सदस्य चंद्रशेखर बारी यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेत, बॅकेच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात माहिती अवगत करून घेतली. बँकेच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देणार असल्याचे सांगत प्रशासकीय मंडळाने सांगत, दिशा स्पष्ट केली आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरकारभाराचा ठपका ठेवत भारतीय रिझर्व्ह बँकेने कलम ११० (अ)नुसार जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते.संचालक मंडळाने या बरखास्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने बरखास्तीला स्थगिती दिली होती. तब्बल तीन वर्षे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते.

गत आठवडयात या प्रलंबित याचिकेचा अंतिम निकाल लागला. न्यायालयाने बरखास्तीवरील स्थगिती उठविली तसेच राज्य शासनाला सात दिवसांत बँकेवर प्रशासक नेमण्याबाबत आदेश दिले होते. यानुसार राज्य शासनाने तातडीने सोमवारी (दि.२२) सायंकाळी उशीराने तीन सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश काढले.

मुंबई व उपनगरे, पूर्व ते पश्चिम एसआरए सहकारी संस्थांचे सहायक आयुक्त एम.ए.आरिफ यांच्या अध्यक्षतेखालील या प्रशासक मंडळात सहकारी संस्थांचे उपनिबंधक चंद्रशेखर बारी तसेच सनदी लेखापाल तुषार पगार यांचाही सदस्य म्हणून समावेश आहे. राज्याचे सहकार आणि सहकारी संस्थांचे निबंधक अनिल कवाडे यांनी हे आदेश काढत या तिघांचे प्रशासक मंडळ बँकेवर नेमले असून तातडीने बँकेचा कार्यभार स्वीकारावा, असे आदेश दिले होते.या आदेशान्वये, प्रशासक मंडळाचे अध्यक्ष एम.ए. अरिफ व चंद्रशेख बारी यांनी मंगळवारी सकाळी १२ वाजता बँकेत येऊन, सुत्रे स्वीकारली.

थकबाकी वसुलीला प्राधान्य

बँकेच्यावतीने त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला. पदभार घेतल्यानंतर लागलीच, अध्यक्ष अरिफ व बारी यांनी बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेत, ओळख करून घेतली. बँकेच्या आर्थिक परिस्थिती, ठेवी, झालेले कर्जवाटप, थकबाकी आदींचा अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. थकबाकी वसुलीला प्रामुख्याने प्राधान्य राहणार आहे. शेतकऱ्यांची बँक असल्याने तिची विश्वासार्हता वाचविण्याचे काम आम्ही करणार असल्याचे प्रशासक मंडळाने यावेळी सांगितले.

तुषार पगार यांचा नकार

बँकेवरील प्रशासकीय मंडळात सनदी लेखापाल तुषार पगार यांचा समावेश करण्यात आला आहे. अध्यक्षांसह मंडळ सदस्य बारी यांनी पदभार घेतला असताना पगार यावेळी अनुपस्थित होते. पगार बँकेवर काम करण्यास फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जात होतेच. त्यानुसार पगार यांनी पदभार घेण्यास नकार कळविला.

अतिरिक्त कामे असल्याने बँकेला वेळ देणे शक्य नसल्याचे पगार यांनी सांगितले. पगार यांनी नकार दिल्याने त्यांच्या जागी अन्य व्यक्तींची नियुक्ती करावी लागणार आहे. यापूर्वी नियुक्त झालेल्या प्रशासकीय मंडळातही पगार यांनी काम केलेले आहे.