घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक; वाचा सविस्तर

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक; वाचा सविस्तर
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

घोटी । Ghoti

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Election for ghoti apmc 18 seats) निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणुकीसाठी ६ डिसेंबर पर्यंत अंतिम मतदार यादी तयार झाल्यावर लगेचच निवडणुका घेतल्या जाणार आहेत. १६ डिसेंबरला जिल्हा निवडणूक अधिकारी (District Election Officer) तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. त्यानुसार १७ जानेवारी २०२२ ला मतदान आणि १८ जानेवारीला मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे....

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या एक महिना आधीच ही निवडणूक होत आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीकडे रंगीत तालीम म्हणून पाहिले जाणार आहे. कोरोनामुळे रखडलेल्या निवडणुकीमुळे बाजार समितीवर प्रशासकीय राजवट लावण्यात आली होती. आता दीर्घ प्रतीक्षेनंतर निवडणूक होत असल्याने चांगलीच चुरशीची परिस्थिती पाहायला मिळणार आहे. इच्छुकांकडून आता मोर्चेबांधणी करायला सुरुवात झाली आहे.

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली असूनही कोरोना महामारी आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे निवडणूका घेतल्या नाही. त्यामुळे बाजार समितीची निवडणूक केव्हा होणार याकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व सभासदांचे लक्ष लागले होते.

सोसायटी गटातून ११ जागा, ग्रामपंचायत सदस्य गटातून ४ जागा, व्यापारी गटातून २ जागा, आणि हमाल मापारी गटातुन १ जागा अशा १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. आर्थिक दुर्बल गट ह्या निवडणुकीत ह्यावेळी असणार नाही. निवडणुकीसाठी प्रारूप व अंतिम मतदार याद्या ३० सप्टेंबर २०२१ ह्या अहर्ता दिनांकावर केल्या जाणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी ( कृ. उ. बा. स. ) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे १० नोव्हेंबर, प्रारूप मतदार यादीवर हरकती/आक्षेप मागवणे १० ते २२ नोव्हेंबर, हरकती/आक्षेप ह्यावर निर्णय देणे २२ नोव्हे ते १ डिसें, अंतिम मतदार यादी तयार करणे ६ डिसें अशा तारखा राज्य निवडणूक प्राधिकरणाकडून देण्यात आल्या आहेत.

त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे १६ डिसें, नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकृती आणि नामनिर्देशनपत्र प्रसिद्धी १६ ते २२ डिसें, छाननी २३ डिसें, वैध नामनिर्देशनपत्रांची प्रसिद्धी २४ डिसें, माघार २४ डिसें २०२१ ते ७ जानेवारी २०२२, निवडणूक चिन्हांसह अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध १० जाने २०२२ असा निवडणूक कार्यक्रम असणार आहे. निवडणुकीसाठी मतदान १७ जानेवारी २०२२ ला घेतले जाणार असून मतमोजणी १८ जानेवारी २०२२ करून निकालाची घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्तांनी नुकत्याच काढलेल्या आदेशाप्रमाणे निवडणूक होणार आहेत.

दसरा, दिवाळीपासून लगेच निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी इच्छुक कामाला लागणार आहेत. नव्या वर्षात होणारी घोटी बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे.

Related Stories

No stories found.