कळवण । Kalwan

कळवण तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सुरु झाला आहे. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवून जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे.

या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायतसमिती निवडणुकांवर होणार आहे.

कळवण तालुक्यातील एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मार्च महिन्यात जाहीर झाला होता. मात्र राज्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलल्या होत्या. या निवडणुकांचा कार्यक्रम पुन्हा जाहीर झाला असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.

कळवण आदिवासी बहुल तालुका असून येथे सरपंच पद कायमस्वरूपी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे. तालुक्यावर माजी मंत्री स्व. ए. टी. पवार यांच्या कामाचा प्रभाव असल्याने त्यांचे कुटुंबीय ज्या पक्षात कार्यरत असतात. त्याच पक्षाचा या तालुक्यात बोलबाला असल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.

आगामी निवडणुकीत कायम राहील अशी तालुक्यात चर्चा आहे. या निवडणुकीत शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक खैरणार, मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, समता तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल, रिपाइं तालुकाध्यक्ष बापु जगताप, किसान सभा सेक्रेटरी मोहन जाधव यांची प्रतिष्ठापनाला लागणार आहे.

या निवडणुकांचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी या निवडणुकीत जास्तीत जास्त जागेंवर उमेदवार उभे करून ग्रामपंचायत सत्ता मिळवण्यासाठी कम्बर कसली आहे. या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो याकडे सर्व तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

निवडणूक कार्यक्रम असा

उमेदवारी अर्ज दाखल करणे - 23 ते 30 डिसेंबर, छाननी - 31 डिसेंबर, माघार, चिन्ह वाटप - 4 जानेवारी, मतदान - 15 जानेवारी, मतमोजणी - 18 जानेवारी.

निवडणूक जाहीर झालेले ग्रामपंचायत

सप्तशृंगगड, ओतूर, मोहमुख, ओझर, पाळे बु., मेहदर, बापखेडा, काठरेदिगर, मोहनदरी, कनाशी, नरूळ, बिलवाडी, अभोणा, कुंडाणे (क ), जमलेवणी, वीरशेत, तताणी, नांदुरी, गोसराणे, कळमथे पा., भुसणी, मुळाणेवणी, देवळीवणी, बोरदैवत, पळसदर, भगुर्डी, सावकीपाळे, लिंगामे, वडाळे.

29 ग्रामपंचायत निवडणुकांकडे भाजपाच्या खासदार भारती पवार, आमदार नितीन पवार, माकपाचे माजी आमदार जे. पी. गावित, जि.प. सदस्या जयश्री पवार, जि.प. सदस्य यशवंत गवळी, पंचायत समिती सभापती मीनाक्षी चौरे, उपसभापती विजय शिरसाठ हे लोकप्रतिनिधी आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी व सत्ता आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी किती गांभीर्याने बघतात यावर निवडणुकांचा निर्णय अवलंबून राहणार आहे.