ज्येष्ठ सर्वोदयी प्रा. वासंती सोर यांचे निधन

सर्वोदय चळवळ आणि जीवन उत्सव परिवाराचा आधारस्तंभ हरपला
ज्येष्ठ सर्वोदयी प्रा. वासंती सोर यांचे निधन

नाशिक | Nashik

ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर (Pro. Vasanti Bhor) यांचे काल रात्री उशिरा (रविवार, दि. १९ जुलै) वृद्धापकाळाने नाशिक (Nashik) येथील राहत्या घरी निधन (Death) झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले तुषार आणि तरंग, सुना गीता आणि सायली आणि नात तेजस्विनी असा परिवार आहे.

नाशिकमधील सर्वोदय आणि जीवनउत्सव परिवाराच्या (Sarvoday Pariwar) त्या आधारस्तंभ होत्या. त्यांचे पार्थिव आडगाव येथील मेडिकल कॉलेजला दान करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

जुन्या पिढीतील निष्ठावंत कार्यकर्ते स्वातंत्र सैनिक मालतीताई थत्ते व श्रीधर उर्फ काका थत्ते यांच्या तेवढ्याच निष्ठावंत कन्या प्रा. वासंती सोर या महात्मा गांधींजींनी स्थापन केलेल्या आणि आचार्य विनोबाजी भावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या वर्धा (Wardha) येथील महिलाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या. विनोबाजींच्या सानिध्यात शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. त्याच ठिकाणी त्यांनी ६ वर्षे अध्यापनाचेही काम केले.

विनोबाजींच्या भूदान पदयात्रेत (Bhudan Movement) काही काळ त्यांच्या सहभाग होता. महात्मा गांधीजींच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभल्याचे त्या अभिमानाने सांगत. तसेच जन्मापासून अंगाला खादी शिवाय दुसऱ्या वस्त्राचा स्पर्श ही न झाल्याचा उल्लेख ही त्या नेहमी करत. आयुष्यभर स्वतः काताई केलेल्या खादीचे वस्त्र आणि कपडे वापरण्याचे व्रत त्यांनी जपले होते.

लौकिक अर्थाने त्या एम. ए. (हिंदी) एम. एड. झाल्या व नाशिकच्या बी एड कॉलेजमध्ये (Nashik Bed College) अनेक वर्ष अध्यापनाचे काम केले. त्याच कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्या पूर्णपणे सामाजिक जीवनात कार्यरत झाल्या. गांधी विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांची विशेषता. गांधींजींवर असणाऱ्या तथाकथित आक्षेपांना संपूर्ण पुराव्यानिशी सडेतोड व चपखल उत्तर देणारे लिखाण त्यांनी लेख व पुस्तकांच्या माध्यमातून केले. या व्यतिरिक्त ही सर्वोदय विचार, स्त्री शक्ती जागरण, खादी, गीता या विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण त्यांनी केले. याच सर्व विषयांवर अनेक व्याख्यानेही त्या देत असत. एम.ए. साठी 'गांधी विचार आणि राष्ट्रीय एकात्मता' या विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला होता. मुक्त विद्यापीठाचा बी.एड. अभ्यासक्रम, बी.एड.साठी ऑडीओ कॅसेट बी.एड. प्रश्नपेढी यांची निर्मिती त्यांनी केली होती.

वयाच्या 85 वर्षापर्यंत ही त्या पूर्ण कार्यरत होत्या. खादी आणि वस्त्र स्वावलंबन हा त्यांचा दुसरा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्या स्वतः तर रोज सूत कताई करतच, पण नाशिकमध्ये त्यांनी एक कताई मंडळ स्थापन केले होते. त्या कोणालाही अगदी आवडीने आणि मेहनतीने शास्त्र शुद्ध सूत कताई आणि चरखा शिकवत.

चीन आक्रमणाच्या वेळेस युवांच्या अभ्यासमंडळ आणि कलापथकाचे संयोजन त्यांनी केले होते. नाशिकच्या महिला हक्क संरक्षण समितीच्या कार्यात त्यांच्या सक्रीय सहभाग असे. १९८८ ते ९० या काळात समाजवादी महिला सभेच्या नाशिक शाखेच्या त्या अध्यक्षाही होत्या. सर्वोदय प्रेस सर्व्हिसच्या त्या ४ वर्षे सहसंपादक होत्या. नाशिकच्या जीवन उत्सव या पर्यावरणीय जीवन शैली व गांधी विचारावर काम करणाऱ्या उपक्रमाच्या त्या आधारस्तंभ होत्या. त्या अंतर्गत होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग तरुणांनाही लाजवणारा असे. आम्हा सर्व कार्यकर्त्यांवर अत्यंत आपुलकीने मातृवत प्रेम त्यांनी केले.

स्वतःचा जीवन प्रवास समस्यामय असूनही त्यांनी कधी ही त्याचे प्रदर्शन, तर केले नाहीच पण सर्व समस्यांना खंबीरपणे तोंड देऊन त्या स्वतः सदैव हसतमुख असत. त्यांच्या जाण्याने गांधी आणि सर्वोदय परिवाराची कधीही न भरून येणारी हानी झाली असून जीवन उत्सव परिवार पोरका झाल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com