नांदगावचे ग्रामदैवत एकवीरादेवी मंदिर

दै. 'देशदूत' मालेगाव विभागीय कार्यालय वर्धापन दिन विशेष -२०२२
नांदगावचे ग्रामदैवत एकवीरादेवी मंदिर

नांदगाव | संजय मोरे Nandgaon

नांदगावचे ( Nandgaon ) ग्रामदैवत असलेल्या एकवीरा देवीचे मंदिर ( Ekvira Devimandir - Nandgaon )शाकंभरी नदीच्या ( shakambhari River ) किनार्‍यावर वसलेले आहे. मंदिरासमोरच तीस फूट उंचीची दगडी दीपमाळ आणि त्याखाली असलेलं श्रीगणेशाचं एक छोटस मंदिर आहे. दर्शनाला जाण्यापूर्वी गणरायाचं दर्शन होतं आणि त्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश होतो. बाजूलाच रेणुकामाता आणि श्री गणेशाची मूर्ती आहे.

या मंदिराला दोन घुमट आहेत. दुसर्‍या गाभार्‍यात एकवीरा देवीची स्वयंभू मूर्ती आहे. दगडाची मूर्ती पूर्वी शेंदूरचर्चित होती, जिचा नंतर जिर्णोद्धार झाला. एकवीरा देवी ट्रस्टच्या पंचांनी लासुरचे कारागीर भावसार यांच्याकडून देवीची सध्या मंदिरात असलेली मूर्ती घडवून घेतली आहे. अकरा फूट उंच असलेली ही मूर्ती सप्तशृंग निवासिनी देवीप्रमाणेच आहे. देवीला अठराभुजा असून तिच्या प्रत्येक हातात विविध प्रकारचे शस्त्र आहेत.

मंदिराच्या भोवती विस्तीर्ण पटांगण असून जवळच शितलादेवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की, सतराव्या शतकात ब्रम्हानंद महाराज यांना देवीचा दृष्टांत झाला आणि पेशव्यांच्या मदतीने त्यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे सांगितले जाते. संपुर्णपणे आखीव रेखीव दगडांमध्ये या मंदिराचे बांधकाम करण्यात आलेले असून आजही मंदिर भक्कम स्थितीत उभे आहे. पूर्वी या मंदिरामध्ये देवीची सहा फुटांची मूर्ती होती. परंतु पंचक्रोशीत देवीची महती पसरली तशी भाविकांची गर्दी वाढू लागली. हे पाहून पुढे हिंदू पंच कमिटीने अकरा फूट उंची आणि अठरा भुजा असलेल्या देवीची प्रतिष्ठापना केली. वाघावर स्वार झालेली एकवीरादेवी शुंभ आणि अशुंभ राक्षसांचा वध करत असल्याचे रूप पाहायला मिळते. देवीच्या हातांमध्ये विविध आयुधे पाहायला मिळतात.

चैत्रोत्सव काळात आणि शारदीय नवरात्रोत्सवात येथे यात्रा भरते. नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस महिला भाविक मंदिरात घटी बसतात. नवरात्रमध्ये नऊ दिवस देवीला नऊ पैठण्या नेसविल्या जातात. दररोज शृंगार केला जातो. मातेचे रूप रोजच्या रोज बदलत असते. देवीचे रोज तीनही रूपांमध्ये दर्शन होते. देवीची पूजाअर्चा करण्याचा मान गुरवांकडे असून स्व. अंबादास गुरव यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रसाद गुरव देवीची पूजाअर्चा करतो. अमरावती, धुळे कार्ला ह्या देवीच्या ठिकाणांबरोबरच नांदगाव येथे एकवीरादेवीचे पूर्ण रूप पहावयास मिळते.

एकवीरा मातेवर भाविकांची अपार श्रद्धा असून देवीच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण झाल्याचे भाविक सांगतात. हिंदू पंचकमिटी ट्रस्टच्या वतीने या मंदिराची देखभाल केली जाते. नवरात्रोत्सवात देवीला सोन्या-चांदीची आभुषणे चढविली जातात. देवीला चांदीचे दोन मुकुट असून नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेच्या उत्सव काळात पालखीतून देवीचा सांदळा व मुकूट यांची गावातून मिरवणूक काढली जाते. चैत्र उत्सवात कुस्त्या, शामीगोंडा, रहाड तसेच सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रम राबवले जातात.

हिंदू पंचकमिटी व छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आयोजित केला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी रहाडबरोबरच बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम आणि मुखवटे (सोंगं) नाचवण्याचा कार्यक्रम मंदिर परिसरात साजरा केला जातो. मंदिरात नवरात्रोत्सव काळात पहाटे चार, दुपारी बारा व रात्री आठ वाजता आरती व महापूजा केली जाते. नवरात्रोत्सव काळात महिला भाविकांची संख्या लक्षणीय असते. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागलेल्या दिसतात. नांदगाव शहरात ग्रामदेवता एकवीरादेवी मंदिराशिवाय कालिकादेवी, म्हंम्मादेवी, लक्ष्मी, हिंगलाजमाता, शीतलादेवी, नांदेश्वरीदेवी आदी देवी मंदिरे आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com