
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashiroad
पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे सर्वांशी समन्वय साधून योग्य निर्णय घेतील. त्याचप्रमाणे तीन पक्षाचे सरकार वेगाने राज्याचा विकास करतील, असा विश्वास उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला...
मंत्री शंभूराज देसाई हे आज नाशिक रोड व देवळाली गाव येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी वसुंधरा देशमुख यांचे निधन झाल्याने देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी मामाचे गाव असलेल्या देवळाली गाव येथे भेट दिली. पन्नास वर्षांपूर्वी शंभूराज देसाई देवळाली गाव येथे माजी खासदार कै. बाळासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानी येत असत.
बाळासाहेब देशमुख शंभुराज देसाई यांचे आजोबा होते. त्यामुळे देवळाली गाव येथील देशमुख वाड्यात मंत्री देसाई लहानपणी उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत येत असत. आज त्यांनी आवर्जून देवळाली गाव येथे भेट दिली. यावेळी देशमुख वाडा येथील कै. वसंतराव तनपुरे यांच्या निवासस्थानी सुद्धा भेट दिली. तत्पूर्वी देवळाली गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. तब्बल पन्नास वर्षानंतर देवळाली गावात आल्याने त्यांनी लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला.
पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या सहकार्याने शरद पवार यांची भेट घेतली जरी असेल तरी तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे या विषयावर मी जास्त भाष्य करू शकत नाही. सध्याचे सरकार हे तीन पक्षाचे सरकार असून राज्याचा विकास आता वेगाने होणार आहे. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 45 खासदार राज्यातून निवडून येतील व विधानसभा निवडणुकीत 225 पेक्षा जास्त आमदार निवडून येथील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे.
पालकमंत्री नेमण्याबाबत विचारले असता देसाई म्हणाले की, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे सर्वांशी समन्वय निर्णय घेतील. तसेच उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा लवकर होईल. महायुतीत कोणाला सामावून घ्यायचे याबाबतचा अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे.
तीन पक्षाचे सरकार हे बुलेट सारखे वेगाने धावणारे सरकार आहे. एकमेकांच्या समन्वयातून व विचारातून हे सरकार राज्याचा विकास करेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राम लक्ष्मणाची जोडी आहे ही जोडी कधीही तुटणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आमदारांना निधी वाटपाचा निर्णय वित्त मंत्री घेत असले तरी अंतिम निर्णय व अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे अन्याय होणार नाही असे तरी आम्हाला वाटते. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायचा पण ते दुर्लक्ष करीत होते. त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री यात फार फरक आहे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लावला.
दरम्यान देवळाली गाव येथे येताच त्यांचे शिवसेनेचे राजू लवटे, योगेश म्हस्के, श्रीकांत मगर त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस व देवळाली गाव पंच कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चैतन्य देशमुख, विक्रम कोठुळे, महेश देशमुख, प्रशांत वाघ, प्रकाश पवार, मंगेश लांडगे, रितेश केदारे, शरद साळवे, किरण कोठुळे, गौरव नवले, पप्पू सय्यद, मनोज जोशी आदी उपस्थित होते.