
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
करोनाचा वाढता संसर्गाला आळा घालण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी नाशिक सराफ संघटनेने मंगळवार (दि.७) पासून १४ जुर्लेपर्यंत सराफ बाजार आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यास ८५ टक्के दुकानदारांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. तर बाजारातील १० ते १५ टक्के दुकाने सुरू होती. मागील तीन महिन्यांपासून सराफा बाजार जवळपास बंद असून रोजच्या कोटयवधीच्या उलाढालीवर पाणी फेरल्याचे पहायला मिळते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने २३ मार्चपासुन लॉकडाऊनची अंमलबजावणीची घोषणा केली. तेव्हापासूनच सराफ बाजार सलग अडीच-तीन महिने बंद होता.
ऐन लग्नसराई, तसेच साडेतीनपैकी गुढीपाडवा व अक्षयतृतीयाला देखील व्यापाऱ्यांच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला. १७ मे नंतर मात्र सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्याने सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी झाली. त्यानंतर मात्र तुरळक लग्नतिथी असल्याने अनेकांनी सोन्याची खरेदी केली, पुढील काळात येणाऱ्या सणासाठी देखील आतापासून बुकिंग करून ठेवले.
बाजारात सोने व चांदीचे भाव वाढले असले तरी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद होता. त्यामुळे ग्राहकांची वाढती गर्दी बघता खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सराफा बाझाराला पेशवेकालीन परंपरा असून इतिहासात पहिल्यांदाच सलग इतके दिवस बाजार बंद असल्याचे पहायला मिळत आहे. या ठिकाणी हजारो करागिर सोने चांदिच्या दागिने, वस्तूंवर कलाकुसरीचे काम करतात. मात्र बाझार बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
स्थानिक व्यापारी व ग्राहकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बाजार आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णयाला प्रतिसाद मिळाला. शहरात १५ दिवसांपासुन करोना रूग्णांची संख्या वाढत आहेत. सराफ बाजारात खरेदी मोठी गर्दी होत आहे. आवश्यक ऑर्डर्स दिलेल्या ग्राहकांसाठी काही तुरळक दुकाने सुरू आहेत.
-चेतन राजापूरकर, अध्यक्ष, नाशिक सराफ संघटना