उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न - आ. सत्यजित तांबे

उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न - आ. सत्यजित तांबे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एमआयडीसीने रिअल इस्टेट कंपनी न बनता उद्योजकांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असावे. नाशिकसह विभागातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार सत्यजित तांबे यांनी दिले.

आमदार झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी प्रथमच निमा कार्यालयास भेट दिली . याप्रसंगी आ. तांबे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी सत्काराला उत्तर दिले. व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे सचिव राजेंद्र अहिरे, आयमा सरचिटणीस ललित बूब, निमा उप समिती चेअरमन व एबीबीचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी आदी उपस्थित होते.

नाशिक जिल्हा तसेच विभागात मोठ्या प्रमाणात असलेल्या व्यावसायिक महाविद्यालयांतून हजारो विद्यार्थी दरवर्षी बाहेर पडतात. या सर्वांना आपण नोकर्‍या देण्याकरता काय-काय उपाययोजना केल्या पाहिजे याचा उद्योजकांनी गांभीर्याने विचार करावा, इगतपुरीतील गोंदेफाटा ते नाशिक आणि पुढे चारही बाजूने होत असलेला विस्तारामुळे नाशिक हे राज्यातीलच नव्हे तर देशातील उद्योगाचे मोठे केंद्र बनत आहे. आता खर्‍या अर्थाने या पट्टयात मोठे उद्योग येण्याची गरज आहे. दुहेरी फायरसेससह, वीजदर, मूलभूत सेवा सुविधा, जागांचे संपादन करणे आदी उद्योजकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दरबारात नक्कीच वकिली करू, असेही तांबे म्हणाले.

यावेळी आयमाचे कोषाध्यक्ष राजेंद्र कोठावदे, निमाचे गोविंद झा, मनीष रावल मिलिंद राजपूत, संजय राठी, सुधाकर देशमुख, कैलास पाटील, राजेंद्र वडनेरे, योगिता आहेर, राहुल गांगुर्डे, हर्षद बेळे, जयंत पगार, श्रीकांत पाटील आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीजदरवाढीविरोधात आवाज उठवा

प्रस्तावित वीज दरवाढ लागू होऊ नये यासाठी शासन दरबारी आवाज उठवावा, नाशिक विभागात नवीन गुंतवणूक येण्याकरता शासन दरबारी आमचे मागणे मांडावे व विभागातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत, दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका करावी, एमआयडीसीचा अनागोंदी कारभार थांबवावा, आदी मागण्या निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी प्रास्ताविकात केल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com