करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावे
नाशिक

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावे

आढावा बैठकीप्रसंगी क्षीरसागर यांचे प्रतिपादन

Abhay Puntambekar

निफाड । प्रतिनिधी Niphad

तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तालुका करोनामुक्त करण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांनी प्रयत्न करावे. तसेच ग्रामस्थांनीही स्वत:ची काळजी घ्यावी. बाजार समित्यांमध्ये येणारे शेतकरी व व्यापारी यांनी सोशल डिस्टन्स पाळत शेतमाल लिलाव होण्यासाठी सहकार्य करावे. तसेच ग्रामस्थांनीही प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

निफाड पं. स.च्या सभागृहात करोना प्रतिबंधक उपाययोजनांसंदर्भात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतात जि. प. अध्यक्ष क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे, तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, जि. प. सदस्य डी. के. जगताप, दीपक शिरसाठ, सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, अमृता पवार, यतीन कदम, पं. स. सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा सुरासे आदींसह तालुका वैद्यकीय अधिकारी, पं. स. सदस्य व अधिकारी, सेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना क्षीरसागर म्हणाले, तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठेत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. शक्यतो घराबाहेर पडू नये. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असेही क्षीरसागर म्हणाले. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनीही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

Deshdoot
www.deshdoot.com