
नाशिक । सोमनाथ ताकवाले Nashik
लांबलेल्या पावसाला शेतकरी, व्यावसायिक आणि पशूपालकही वैतागले आहेत. मेंढपाळांनाही लांबलेला पावसाचा मुक्काम आर्थिक फटका देणारा ठरला आहे. रानोमाळ भटकंती करणार्या मेंढपाळांंच्या मेंढ्यांचे नवजात कोकरे हवेतील आर्द्रता आणि जमिनीतील ओलावा यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. भटकंती करणार्या या घटकाच्या समस्येकडे यंंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती आहे.
मेंढ्यांना अधिक पाऊस मानवणारा नसतो, यंदा तर ज्या भागात पाऊस अतिशय विरळ असतो, त्या नांदगाव, सिन्नर, येवला, मनमाड या भागात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला. या भागात मेंढपाळ चराईसाठी मेंढ्यांचे कळप घेऊन भर पावसाळ्यात भटकंती करत असतात. या भागात अचानक झालेला पाऊस मेंढ्यांच्या जीवावर बेतणारा ठरला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात मात्र पावसाचा सतत होणारा मारा, हा मेंढ्यांना गारठवून मृत्यूला कारणीभूत ठरलेला आहे. हवेतील गारवा, आर्दता, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि जमीनील ओलावा, नव्याने जन्माला येणार्या कोकरांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारा ठरला आहे. यावर काही उपाययोजना करता येत नसल्याने जिल्ह्यातील मेंढपाळांना डोळ्यादेखत कोकरांचा होणारा मृत्यू पाहावा लागलेला आहे.
पावसाची संततधार आणि उन्हाचा अभाव यामुळे भिजलेल्या मेंढ्या निम्म्यापेक्षा अधिक मरण पावल्या आहेत. कोकरं तर जगतच नाही. माझ्या 200 मेढ्या होत्या. पण पावसामुळे त्या निम्याच उरल्या आहेत. आजार, साथीचे रोग यामुळे कधी एवढ्या मेंढ्या दगावल्या नाही. त्यापेक्षा अधिक मेंढ्यांवर पावसाने संक्रांत आली आहे.
गुलाब सदगिर, मेंढपाळ, डुबेरे