
नाशिक । प्रतिनिधी Nashik
शिवसेना राज्यसभा खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut )यांना पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ( ED) चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने नाशिक शहरातील विविध राजकीय पदाधिकार्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या.
ईडीची ही कारवाई सूडबुध्दीने केलेली कारवाई असून हा शिवसेना संपवण्याचा हा डाव आहे. मात्र शिवसेना व सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहेत. मी झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही, हा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. हा मूलमंत्र तमाम शिवसैनिक अवलंबतील व त्यांच्यावरील अन्यायाचा व सूडबुध्दीतील कारवाईबाबत जाब विचारले जाईल.
सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख शिवसेना
कायद्यासमोर सर्व सारखे असतात. त्यामुळे राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले. दूध का दूध पाणी का पाणी दिसेल. सत्य बाहेर आलेच पाहिजे.
गिरीश पालवे, शहराध्यक्ष भाजप नाशिक
खा. संजय राऊत यांच्यावर झालेली ही कारवाई म्हणजे ठरवून केलेला प्रकार आहे. अशा प्रकारच्या कारवाया म्हणजे लोकशाही संपविण्याचा भाजपचा हा निर्धार आहे. आपल्या विरोधात जे बोलतील त्यांना टार्गेट करायचे आणि एकशाही एक अंमल कारभार करायचा, हेच भाजपचे धोरण आहे.
डॉ. हेमलता पाटील, प्रदेश प्रवक्ता काँग्रेस
शिवसेना खासदार संजय राऊत यांना महाराष्ट्र नवनिर्माणसेना प्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वीच सल्ला देत आतमध्ये गेल्यावर भाषणाचा सर्वे करा, असा सल्ला दिला होता. अति तिथे माती ही म्हण आज खरी ठरली आहे. भोंगे कुणाचे जोरात होते आणि पिपाण्या आता कोणाच्या वाजल्या हे ह्या जनतेने पहिले आहे. खा. राऊत यांच्यावर गंभीर आरोप आहे. तपास यंत्रणा त्याच योग्य तपास करणार, असा आम्हाला विश्वास आहे, तसेच दोषी असेल तर त्यांना शिक्षा होईल.
पराग शिंत्रे, प्रवक्ते मनसेना
सत्ताधार्यांच्या विरोधात आणि अन्यायाच्या विरोधात जे जे बोलतील त्यांच्यावर ईडी, इन्कमटॅक्स व अन्य केंद्रीय यंत्रणांकडून अशाच प्रकारची कारवाई होण्याची नवीन संस्कृती जन्माला आली आहे. यामध्ये यापूर्वी सुद्धा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अनिल देशमुख, नवाब मलिक व अन्य विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर कारवाया झाल्या आहेत. परंतु हे जास्त दिवस चालणार नाही भगवान के घर देर है पर अंधेर नही. एक दिवस दूध का दूध पाणी का पाणी होईल.
अॅड. रवींद्र पगार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
केंद्रातील भाजपचे सरकार हे भीतीचे राजकारण करत असून ते लोकशाहीला घातक आहे. याशिवाय ज्या लोकांवर ईडीची कारवाई होते, त्यानंतर ते लोक भाजपमध्ये जातात त्यांच्यावर नंतर कारवाई का होत नाही. राज्यपालांच्या वक्तव्यावरील लोकांमधील असलेली चीड दुर्लक्षित करण्यासाठी संजय राऊत यांच्यावर खोटे आरोप लावून ईडीची कारवाई करण्यात आली.
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
याप्रकारे काँग्रेस सत्ता स्थापन करण्यासाठी सीबीआयचा वापर करत होती; त्याच पद्धतीने आता भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापन करण्यासाठी ईडीचा वापर करीत आहे. हे अतिशय चुकीचे आहे. दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र या सर्व ठिकाणी आता ईडी अॅक्टिव्ह झाल्याचे बघायला मिळत आहे.
जगबिर सिंग, आम आदमी पार्टी, नाशिक