नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संकट असले तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही युरोपिय, गल्फ व इतर देशांना नाशिकच्या द्राक्षांच्या गोडव्याचा आस्वाद घेता येणार आहे. यंदा 1 जानेवारीपासून युरोपीयन देशांना 44 कंटेनरमधून 573 मेट्रीक टन तर नॉन युरोपीयन देशांना 320 कंटेनरमधून 5914 मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. या माध्यमातून मोठया प्रमाणात परकीय चलन प्राप्त झाले आहे. आगामी काळात देखील मोठया प्रमाणात द्राक्ष निर्यात होणार आहे.

जगभरात करोनाच्या नव्या स्ट्रेनने डोक वर काढले असून अनेक युरोपिय देशात पुन्हा लॉकडाउन लावण्यात आला आहे. या संकटाचा थेट परिणाम द्राक्ष निर्यातीला बसण्याची भिती होती. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतातुर झाला होता. पण द्राक्ष निर्यातीला परवानगी मिळाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चालु वर्षाच्या पहिल्या महिन्यात जिल्ह्यातून जवळपास 6487 मेट्रीकटन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

यात 1 जानेवारीला द्राक्षांचा पहिला कंटेनर जर्मनीला रवाना झाला. दुसरा 28 मेट्रीक टनांचा कंटेनर इंग्लंडसाठी पाठविण्यात आला. 1 ते 28 जानेवारीपर्यंत युरोपीयन देशांना 44 कंटेनर मधून 573 मेट्रीक टन द्राक्ष पाठविण्यात आले. तर रशिया,चीन,कालड़ा, दुबई , जर्मनी , मलेशिया आदी देशांत 320 कंटेनर मधुन 5 हजार 914 मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. देशात एकूण द्राक्ष निर्यातीच्या 91 टक्के द्राक्ष निर्यात ही एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते. आगामी काळात करोना संकटाने युरोप व इतर देशात डोके वर काढले नाही तर द्राक्ष निर्यातीला अडथळा येणार नाही.

जिल्ह्यात 58 हजार 367 हेक्टरवर द्राक्ष

नाशिक जिल्ह्याची द्राक्षपंढरी अशी ओळख आहे.निफाड तालुक्यात सर्वाधिक 22 हजार हेक्टरवर द्राक्ष आहे. त्या खालोखाल दिंडोरीत 15 हजार 758,नाशिकमध्ये 11 हजार 671, तर चांदवडमध्ये 5 हजार148 हेक्टर द्राक्ष पिकाची लागवड आहे. यात थॉमसन, शरद, फ्लेम सीडलेस, सोनाका, तास-ई-गणेश,एच-5, क्रिमसन, फन्टासी, क्लोन-2, सुधाकर सीडलेस या द्राक्षपिकांच्या जाती जिल्ह्यामध्ये लागवडीखाली आहेत.