जिल्हा न्यायालय
जिल्हा न्यायालय
नाशिक

जिल्हा न्यायालयात लवकरच ई - कोर्ट

देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

नाशिक जिल्हा न्यायालयात आता ई कोर्ट सुरू होणार आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ या पद्धतीने या कोर्टाचे काम होणार असून, देशभरातील हा पहिलाच पायलट प्रोजेक्ट आहे. तो यशस्वी झाल्यास आगामी काळात देशभरातील सर्व न्यायालयांमध्ये याच प्रकारे ऑनलाईन कामकाज सुरू करण्यात येणार आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत हे कामकाज सुरू होणार असल्याचे सुत्रांनी सांगीतले.

करोनाचा प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी 23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे याचा न्यायालयीन कामावर मोठा परिणाम होऊन अनेक खटले प्रलंबित पडले आहेत. यामुळे ऑनलाईन कामाचा जोर वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयही यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती डॉ. धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे.

या समितीने मंजुरी दिल्याने सध्या जिल्हा न्यायालयात ई कोर्टाचे काम गतीमान झाले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात ई कोर्टाचे ऑनलाईन उद्घाटन होणाार आहे. यामुळे न्याालयीन कामास गती मिळू शकते. खटला दाखल करण्यापासून ते सुनावणीपर्यंत सर्वच काम ऑनलाईन होणार असल्याचा फायदा पक्षकारांना सुद्धा होईल, असे महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशने अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी स्पष्ट केले.

न्यायालयात दर महिन्याला सरासरी वेगवेगळ्या प्रकारचे पाचशे खटले दाखल होतात. दाखल खटल्यांची संख्या मोठी असून, न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी ई कोर्ट ही संकल्पना महत्त्वाची ठरेल. या पार्श्वभूमीवर न्यायालयात प्रशासकीय पातळीवर अनेक बदल होत आहेत. गत तीन महिन्यांपासून जवळपास ठप्प असलेले काम ई कोर्टमुळे सुरू होईल तसेच आगामी काळात याच पद्धतीने सर्वत्र कोर्टाचे कामकाज पार पडेल नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सांगीतले.

ई कोर्ट प्रक्रिया सुरू झाल्यामुळे खटला दाखल करणे, सुनावणी, निकाल, समन्स बजावणे अशी सर्व कामे ऑनलाईन होतील. वकीलांना आपल्या चेंबर्स वा घरातूनही कोर्टाच्या कामात सहभागी होता येईल. वेळ, पैसा वाचविणार्‍या ई कोर्टबाबत अनेक जेष्ठ मंडळीसह तरूण वकीलही खूप सकारात्मक असल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी स्पष्ट केले. ई कोर्ट सुरू झाले तरी नियमीत कोर्टाचे काम बंद होणार नाही. ते सुरूच राहिल. मात्र, करोनाचे संकट आणि भविष्यात ई कोर्टाचे वाढणारे महत्व याचा तुलनात्मक विचार करता ई कोर्ट हे वकिलांसह पक्षकार, सरकार, कोर्ट प्रशासन अशा सर्वांना खूपच फायदेशीर ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या कोणत्याही कारणांमुळे नोंदणी न करू शकणार्‍या वकीलांना ई कोर्ट सुरू झाल्यानंतरही नोंदणीची संधी उपलब्ध राहणार आहे.

वकिलांना नोंदणी बंधनकारक

ई कोर्टाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी इच्छूक वकील सध्या त्यांसंबंधी नोंदणीच्या कामात गर्क आहे. वकीलांना नाशिक जिल्हा न्यायालयाची सीआयएस नोंदणी आणि ई फिलींग नोंदणी करणे आवश्यक आहे. अशी नोंदणी करणार्‍या वकीलानांच ई कोर्टाच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे. सध्या या नोंदणीची लगभग जिल्ह्यातील जवळपास साडेचार हजार वकीलांमध्ये सुरू आहे. या दोन नोंदणीची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी किमान 30 ते 35 वकीलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे वकील उर्वरीत वकीलांना नोंदणी प्रक्रियेत मदत करणार आहेत. जिल्ह्यातील किमान अडीच ते तीन हजार वकील यासाठी इच्छूक आहेत.

असे असतील ई कोर्टाचे फायदे

* वकील, पक्षकार, पंच, पोलिस अशांना कोणत्याही ठिकाणावरून थेट सहभागी होता येईल

* कोर्टासह पंच, पोलिस आणि खटल्याशी निगडीत नागरिकांचा वेळ व पैस वाचेल

* वकीलांना काही दिवसातच अगदी घरातूनच काम करणे शक्य होईल. यामुळे खर्च वाचेल

* वेळ वाचल्याने खटले निकाली लागण्याचे प्रमाण वाढेल

* पारदर्शकता वाढेल

* तंत्रज्ञानामुळे खटला दाखल करण्याचे काम सोपे होईल

Deshdoot
www.deshdoot.com