
दहिवड | वार्ताहर | Dahiwad
देवळा तालुक्यातील उमराणे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोटाबंदीच्या काळात शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली होती. त्यावेळी काही शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी धनादेश दिले होते. त्यापैकी काही व्यापाऱ्यांच्या खात्यावर पैसेच नसल्याने शेतकऱ्यांना मिळालेले धनादेश वटले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही. याबाबत प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलनेदेखील करण्यात आली होती. तरी देखील पैसे मिळाले नसल्याने प्रहारच्या वतीने मुंबई मंत्रालयावर दि. 25 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या मोर्चा आयोजन करण्यात आले होते...
आंदोलनाची दखल घेत देवळा पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक पाटील यांच्या वतीने देवळा पोलीस स्टेशन मध्ये कळवणचे उपभागीय पोलीस अधिकारी संजय वाबळे, तहसीलदार विजय सूर्यवंशी, उमराणे बाजार समितीचे सभापती चंदूदादा देवरे, माजी सभापती विलासकाका देवरे, उपसभापती मिलिंद शेवाळे, संचालक दीपक निकम, बाजार समितीचे सचिव नितीन जाधव, प्रहार उपजिल्हाध्यक्ष कृष्णा भाऊ जाधव, तालुकाध्यक्ष संजय दहिवडकर, हरिसिंग ठोके यांच्यासह शेतकऱ्यांची बैठक घेऊन दि. 10 नोव्हेंबरपर्यंत संबंधित व्यापाऱ्यांच्या मालमत्तेचे लिलावाबाबत प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रहारचे होणारे आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची माहिती प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.