
नाशिक | नरेंद्र जोशी | Nashik
लॉकडाऊन काळात (Lockdown) सर्वच बंद झाल्यावर हातावर पोट असणार्या दीनदुबळ्यांची दयनिय अवस्था झाली होती. शासनाने (Government) गहू, तांदूळ मोफत देण्याची व्यवस्था केली असली तरी तेवढ्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्यच नव्हता. अशा काळात विविध धार्मिक, सामाजिक संघटना सेवेसाठी पुढे आल्या....
त्यांनी मदतीचा हात देऊ केला. आपल्या भागात कोणी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेतली. ज्याला जेवढे शक्य होईल तेवढे प्रत्येकानेच केले. त्यामुळे लॉकडाऊनसारख्या संकटकाळात प्रत्येकाला सुखाचे दोन घास मिळाले. पोटाची आग विझल्यानेच वातावरण शांत राहिले.
शासनाने मोफत धान्याबरोबरच शिवभोजन (Shiv Bhojan) सुरू केले. त्यानंतर जैन समाजाने विल्होळी (Vilholi) येथील जैन मंदिरातून हजारो लोकांना जेवाणाचे डबे देण्याची व्यवस्था केली. शहरातील गुरुद्वारातून शीख बांधवांनी करोनाचा विचार न करता रात्रंदिवस लंगर सुरू केले. नवचेतना संस्थेने रोटी बॅँक सुरू केली.
मातृभूमी प्रबोधन संस्थेने अनेकांना किराणा भरून दिला. आयटक, सीटू, श्रमिक सेना, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आआपा यांनीही ज्या कामगारांचा रोजगार गेला त्यांना तातडीने मदतीचा हात दिला.
प्रत्येक समाजातील श्रीमंंतांनी आपल्याकडून जेवढी मदत करता येेईल तेवढी केली. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना किराणा मिळाला, धान्य मिळाले. एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ या उक्तीची प्रत्यय प्रत्येक ठिकाणी येत गेला.
दारापुढे आलेल्या याचकाला कोणीही रित्या हाताने परत पाठवले नाही. गाड्या बंद झाल्याने गावाकडे पायी निघालेल्या कामगारांनासुद्धा नाशिकपासून (Nashik) मुंबईपर्यंंत (Mumbai) महामार्गालगत प्रत्येकानेच मदतीचा हात दिला. आजही तो मदतीचा हात आठवला तरी अन्नदाता सुखी भव हे शब्द ओठावर आल्याशिवाय राहत नाहीत. एकूणच लॉकडाऊनमध्ये (Lockdown) नाशिककरांनी माणुसकीचे दर्शन हम सब एक है.. याची जाणीव करून दिली.