पंचाळे । Panchale (वार्ताहर)

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात आठवडे बाजार बंदी आदेश देण्यात आले असून त्यामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नियमाच्या अधीन राहून आठवडे बाजार सुरू करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

जिल्हाधिकार्यांनी मागील आठवड्यात करोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील संपूर्ण आठवडे बाजार एका आदेशान्वये बंद ठेवण्याची अधिसूचना काढली आहे. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील सर्व आठवडेबाजार बंद आहेत.

या आठवडे बाजारामध्ये शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. शेतकर्यांनी अल्पशा पाण्यावर रब्बी हंगामामध्ये पिकवलेला भाजीपाला पिकाची विक्री करण्यासाठी आठवडे बाजार हा महत्वाचा पर्याय आहे. आठवडे बाजार बंद असल्याने भाजीपाल्यामध्ये मंदीची लाट आली असून शेतकर्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही.

अनेक शेतकर्यांनी कोबी, फ्लॉवर, गाजर आदी पिकांचा जनावरांना चारा म्हणून वापर सुरू केला आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आठवडे बाजार बंदीचा मोठा फटका बसला असून त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे.

आठवडे बाजार बंदचा शेतकर्यांवर मोठा परिणाम झाला असून शेतातील माल विकायचा कुठे? असा प्रश्न शेतकर्यांपुढे उभा कुठे आहे. यामुळे नागरिकांनाही ताजा भाजीपाला मिळणे दुरापास्त झाले असून नागरिकांचे हित लक्षात घेऊन अटी व नियम लावून आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.