'या'मुळे शेतकर्‍याने मागितली आत्महत्येची परवानगी

'या'मुळे शेतकर्‍याने मागितली आत्महत्येची परवानगी
न्यूज अपडेट

म्हाळसाकोरे । वार्ताहर | Mhalasakore

नापीक होत चाललेल्या जमिनीत एकमेव उसाचे पीक (Sugarcane crop) येते. ऊस लागवड केल्यावर चार पैसे मिळतात पण त्या उसाला तोड मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती खालावली आहे.

कर्ज काढून कुटुंब चालवले ते कर्ज भरण्यासाठी सावकार, बँक तगादा लावत आहे. ऊस तोडणी करण्यासाठी नोंदणी केलेल्या कारखान्यात चकरा मारून जीव कासावीस झाला आहे. आत्ता कारखाना संचालक उडवाउडवीचे उत्तर देत असल्यामुळे आत्ता आत्महत्या (Suicide) केल्याशिवाय पर्याय नाही.

त्यामुळे आत्महत्येला कारखाना जबाबदार राहील अस पत्र तामसवाडी येथील शेतकरी (farmer) दत्तू आरोटे यांनी स्व. अशोकराव बनकर पतसंस्थेने भाडेतत्वावर चालविण्यास घेतलेल्या रानवड साखर कारखान्याचे चेअरमन रामभाऊ माळोदे (Ranwad Sugar Factory Chairman Rambhau Malode) यांना पाठविले आहे.

गोदाकाठ परिसरात अद्याप हजारो हेक्टर ऊस तोडणी (Sugarcane harvesting) अभावी उभा आहे. तालुक्यातील रासाका या गाळप हंगामात सुरू झाला. मात्र कारखान्याची गाळप क्षमता बघता तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र आणि गाळप क्षमता याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे नोंद केलेल्या ऊसाला तोड मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुक्यातील कारखाना सुरू झाल्यामुळे गोदाकाठच्या शेतकर्‍यांनी इतर कारखान्यांकडे ऊसाची नोंद केली नाही. साहजिकच आता नगर जिल्ह्यातील कारखाने ऊस तोडणी करीत नाही. रासाका आज ना उद्या ऊसतोड नक्की करेल.

परंतु यात वेळ जास्त होत आहे. शिवाजी ऊसतोडणी कामगार देखील घराकडे परतू लागले आहे. त्यामुळे आपला ऊस तोडला जाणार की नाही अशी भीती शेतकर्‍यांना वाटू लागली आहे. तामसवाडी येथील शेतकरी दत्तु आरोटे यांचे सर्व क्षेत्रात ऊसाचे पीक उभे आहे. ऊस न तुटल्यामुळे त्यांना इतर पीके घेता आली नाही. आर्थिक देवाण-घेवाण ही ऊसाच्या भरवशावर असल्याने व आता ऊस तुटत नसल्याने जीवनात नैराश्य आल्याचे सांगून आपण रासाका संचालक मंडळाला पत्र पाठवून आत्महत्येस परवानगी द्यावी असे नमूद केले आहे. तालुक्याच्या गोदाकाठ परिसरात अद्यापही मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे.

Related Stories

No stories found.