
घोटी | Ghoti
मुंबई-नाशिक सिन्नर फाटा (Mumbai-Nashik Sinner Bypass) सुप्रीम कोर्ट कमिटीने 'ब्लॅक स्पॉट' घोषित केला आहे. या परिसरात तातडीने जंक्शन उड्डाणपुल करण्यात यावा यासाठी गेल्या दोन वर्षभरापासून काम सुरू आहे. या संथगतीच्या कामांमुळे घोटी टोल नाका ते खंबाळे पर्यंत पाच ते सहा किलोमीटरची वाहतूक कोंडी होत आहे.
त्यातच धुळीचे साम्राज्य पसरले असुन त्यामुळे वाहन चालकांसह स्थानिक व्यावसायिक या धुळीने त्रस्त झाले आहेत. या जंक्शन उड्डाणपुलाचे कामकाज कासव गतीने सुरू असल्यामुळे येथे नेहमीच अपघात होत आहेत. अद्यापपर्यंत या उड्डाण पुलाचे काम धिम्या गतीनेच सुरू आहे.
हे काम जलद गतीने करण्यात यावे यासाठी भाजपाच्या वतीने युवा नेते मयूर परदेशी व जिल्हा पदाधिकारी निखिल हांडोरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सबंधित बाधकाम विभागाची भेट घेत लवकरात लवकर या उड्डाण पुलाचे काम जलदगतीने करावे अशी मागणी केली आहे. तसेच भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे.
या उड्डाण पुलाच्या कामामुळे या परिसरात असंख्य अपघात झाले असुन आज पर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यापासून घोटी टोलनाका ते खंबाळे फाट्यापर्यत महामार्गाची अक्षरशा चाळण झाली आहे. तरी ही संबंधित बांधकाम विभाग मात्र डोळेझाक पणा करत आहे. वाहन चालक व प्रवाशी वारंवार तक्रार करत असताना देखील दुर्लक्ष केले जात असल्याने वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.