सिन्नर : बदलत्या वातावरणामुळे चाळीतील कांदा सडू लागला

कांदा दरात घसरण
सिन्नर : बदलत्या वातावरणामुळे चाळीतील कांदा सडू लागला
कांदा

पंचाळे । Panchale

दोन महिन्यापूर्वी शेतकर्‍यांनी कांदा चाळीमध्ये साठवलेला कांदा सध्याच्या वातावरणामुळे सडू लागल्याने शेतकर्‍यांनी कांद्यास विक्रीसाठी बाजार समितीची वाट दाखवली आहे. पंचाळे परिसरात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याचे उत्पादन झाले. मार्चपासून लॉकडाऊन असल्याने आठवडे बाजाराची परिस्थिती कधी चालू कधी बंद अशी होती. त्यामुळे कांदा दरामध्ये मोठी घसरण झाली.

अगदी पाचशे ते सातशे रुपये क्विंटलवर कांद्याचे भाव स्थिर होते. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी कांदा बियाणे, मशागत, खते, कीटकनाशके, वाहतूक खर्च करून कांदा पीक घेतले. कांदा साठवण्यासाठी कांदा चाळींची उभारणी केली. तर काही शेतकर्‍यांनी भाड्याने शेतकर्‍यांच्या चाळी घेऊन त्यामध्ये कांदा साठवला. शेतकरी कांदा पिकाला तेज व काळोखी येण्यासाठी कांदा निर्मितीच्या वेळी युरिया खताचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

त्यामुळे तोच कांदा नंतर कांदा चाळीमध्ये ठेवल्यानंतर एक महिन्यानंतर सडण्यास सुरुवात होते. त्यातून पाणी व मोडा निर्मिती होते. त्याचा प्रादुर्भाव चाळीतील कांद्यात होतो. त्यामुळे सध्या शेतकरी चाळीतील कांदा काढून चाळणी करून खराब कांदा फेकून देऊन व योग्य प्रतीचा कांदा निवडून तो मिळेल त्या भावात विकण्यासाठी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेत आहे. त्यामुळे वाढीव भाव मिळेल या अपेक्षेवर साठवलेला कांदा अत्यल्प कमी किमतीमध्ये विकण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

१०० क्विंटल कांदा दोन महिन्यापूर्वी कांदा चाळीमध्ये साठविण्यात आला होता. वाढीव भाव मिळेल या अपेक्षेने दोन महिने वाट बघितली. मात्र, सध्या पावसाळी वातावरणामुळे चाळीतील कांदा सडू लागला असून उग्र वास येऊ लागला आहे. जवळपास ३० ते ४० टक्के कांदा सडू लागल्याने मिळेल त्या किमतीत कांदा विक्री शिवाय पर्याय उरलेला नाही.

- भाऊसाहेब सेंद्रे, शेतकरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com