पावसाअभावी भात आवणी खोळंबली

सून झालं रानसार पावसाविना...
पावसाअभावी भात आवणी खोळंबली

नाशिक । गोकूळ पवार Nashik

गेल्या आठ, दहा दिवसांपासून पावसाने दडी ( lack of rain ) मारल्याने त्र्यंबक तालुक्यातील काही भागात भात आवणीचे कामे खोळंबली आहेत.

त्र्यंबक तालुक्यात प्रमुख पीक असलेल्या भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यंदाही माशागत केल्यानंतर भाताची लागवड करण्यात आली. परंतु पावसाच्या माहेर घरात पाऊसच गायब झाल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

दरम्यान सध्या भाताची रोपे तयार झाली असून पावसाअभावी भात लावणीची कामे थांबलेली आहेत. ज्या शेतकर्‍यांना पाण्याची व्यवस्था आहे. त्यांनी पाणी भरून भात लावणी करण्यावर भर दिला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील हिरडी, रोहिले, माळेगाव आदी परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतीची कामे रखडली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला असून, भात लावणी करण्यासाठी आवणांत चिखल नसल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षेत आहे. परिसरातील भात, वरई नागलीची रोपे उन्हांच्या तडाख्यामूळे करपू लागली आहेत. उन्हांमुळे भात पिके पिवळी पडून संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

पावसाची लपाछपी

गेल्या दहा, पंधरा दिवसात अगदी तुरळक प्रमाणात पाऊस पडला असून भात लावणी साठी जोरदार पाऊस आवश्यक असतो. भात पिकाला अधिक पाण्याची आवश्यकता असते. परंतु यंदा हे चित्र बदलल्याचे स्थानिक शेतकर्‍यांनी सांगितले.

दुबार पेरणीनंतरही चिंता कायम

यंदा सुरुवातीला मान्सूनपूर्व काही भागात सलग 8 दिवस पाऊस झाल्यानंतर अनेक शेतकर्‍यांनी कृषी खात्याच्या पेरणीस घाई करून नका या सूचनेकडे दुर्लक्ष करत मका, सोयाबीन, मुग, भुईमूग आदी पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्याच्या काही भागात मका, सोयाबीन पिकाची कमी प्रमाणात उगवण झाली. त्यानंतरही पाऊस न आल्याने अनेकांनी ती पिके मोडून दुबार पेरणीची तयारी केली यामुळे पेरणी केलेली महागडी बियाणे व खते वाया गेली.

त्यानंतर 27-28 जुनला पुन्हा काही ठिकाणी अल्प तर काही ठिकाणी मध्यम प्रमाणात पाऊस झाला आणि शेतकर्‍यांनी पुन्हा महागडी बियाणे खरेदी करून दुबार पेरणी केली. मात्र त्यानंतर पुन्हा वरूण राजाने डोळे वटारले. मात्र ज्या शेतकर्‍यांच्या विहीरीला पाणी आहे त्या शेतकर्‍यांनी मका पिकाला थोडे थोडे करून पाणी भरण्यास सुरूवात केली तर बाकी शेतकर्‍यांवर पुन्हा तिसर्‍यांदा पेरणीचे संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com