
सारिका पूरकर-गुजराथी
नाशिक
पालक तसेच प्रशासनाची अनास्था ही चित्रकलेसारख्या कलेच्या मुळावर उठली असून राज्यात गेल्या सात वर्षांपासून राज्यातील शाळांंमध्ये हजारो कलाशिक्षकांची पदे रिक्त आहेत. सेवानिवृत्तीमुळे ही पदे रिक्त झाली होती. त्यानंतर या पदांवर भरती करण्यात आलीच नाही. कलाशिक्षकांची भरतीच नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही चित्रकलेविषयीची गोडी कमी होत असल्याचे चित्र आहे. चित्रकला शिक्षकांबाबतची ही उदासीनता एवढ्यावरच संपत नाही तर राज्यासह नाशिक महानगरपालिका व जिल्हा परिषद शाळांमध्येही महिला चित्रकला शिक्षकांची संख्या नगण्य दिसून येत आहे.
भारतीय संस्कृतीत कलाकुसरीचे संस्कार मुलींवर जन्मजातच होतात. मात्र असे असले तरी या कलागुणांचे करिअरमध्ये रुपांतर करणार्या महिलांचे प्रमाण तुलनेत नगण्य राहिले आहे. महिला चित्रकला शिक्षकांच्या बाबतीत ही परिस्थिती चपखल आहे. राज्यासह नाशिक महानगरपालिका व जिल्हा परिषद स्तरावरील शाळांमध्ये चित्रकला शिक्षक म्हणून बहुतांश पुरुष शिक्षकच कार्यरत आहेत.
दरम्यान कलाशिक्षक भरतीसाठी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महांसंघाने शासन दरबारी अनेक प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणजे यासंदर्भात जुन महिन्यात सरसकट शिक्षक भरतीचा जीआर काढून शासन मोकळे झाले आहे.
दरम्यान, गेल्या सात वर्षांपासून कलाशिक्षक भरती रखडल्यामुळे बारावीनंतर एटीडी हा अभ्यासक्रमालाही प्रवेश नाकारला जातोय. जर करिअर म्हणून, नोकरी म्हणून संधीच मिळणार नसेल तर कोर्स करुन करायचं काय? असा उद्विग्न सवाल उपस्थित केला जात आहे.
पालकांची अनास्थाही चित्रकलेत दिसून येत आहे. अॅकॅडमिक शिक्षण पूर्ण केले तरच चांगले करिअर, चांगले व्यक्तिमत्व घडू शकते हा पारंपरिक पगडा कायम असून विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी अजूनही प्रोत्साहन देण्यात कुटुंब पातळीवर उदासीनता कायम आहे.
शिक्षकांचे पाट्या टाकणारे काम
पालकांनंतर मुलांना घडविणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. मात्र महानगरपालिका व जि. प. शाळांमधील चित्रकला शिक्षक या बाबतीत पाट्या टाकणारे काम करतानाचे चित्र आहे. २७ मिनिटांचा तास कसा तरी एकदाचा भरला की पगार खिशात टाकून मोकळे होणारे चित्रकलाशिक्षक मुलांना चित्रकलेतील सौंदर्यदृष्टी रुजविण्यात कमी पडत आहेत.
कलेतून संंवेदनशीलता येते, सजगता येते. मात्र शिक्षकांनांच ही सजगता विद्यार्थ्यांना देण्यात रस नाहीये. चित्रकला, चित्रकला तास आणि चित्रकला शिक्षक या गोष्टी प्राथमिक शिक्षणातून हद्दपार होतात की काय अशी शंका घेण्यास वाव निर्माण झाला आहे.
महाविद्यालयीन पातळीवर विद्यार्थी संख्या रोडावली
नाशिकला शिवाजी तुपे, भि. रा.सावंत यांसांरख्या चित्रकारांचा वारसा लाभला आहे. राजेश व प्रफुल्ल सावंत यांच्यासारखे ैआंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार जगभरात नाशिकचा डंका वाजवत आहेत. मात्र या कलाकारांपासून प्रेरणा घेत कलेला करिअर ऑप्शन निवडण्यासाठी युवा पिढी अजूनही तितकी उत्सुक नाही.
नाशिकमधील ललित कला महाविद्यालयांमध्ये ड्रॉईंग, पेंटिंंग, कलाशिक्षक पदविकासारख्या अभ्यासक्रमांची प्रवेशक्षमताच मुळात ५०, ३०, २५, १५ विद्यार्थी इतकी नगण्य ठेवण्यात आली आहे. त्यातही प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे.
यावरुनच चित्रकलेसारख्या कलेला लागलेले ग्रहण लवकर सुटणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मुंबईच्या जे.जे.स्कुल ऑफ आर्टसारख्या संस्थेची मान्यता रद्द झाल्यानंतर राज्य प्रशासनाचीही कला शिक्षणाप्रतीची अनास्था उघड झाली आहे.
सध्याचे टू मिनिट कल्चर किंवा रेडिमेड कल्चर चित्रकलेला निराशेच्यां गर्तेत ढकलत चालले आहे. सगळं सहज आणि आर्टिफिशियल इंटिलिजन्सने मिळू लागलेय. म्हणूनच घराच्या भिंती सजवण्यासाठी २०-२५ हजाराचे पेंटिंग घेण्याऐवजी एखादे पोस्टर चिकटवले जाते. किंवा आता तर डिजिटल पेटिंंग सारखे पर्याय उपलब्ध झाले आहेत. म्हणूनच मुलांमध्येही चित्रकलेविषयीची ती सौंदर्यदृष्टी, आस्था पाझरत नाहीये.परिणामी शाळा पातळीवरही चित्रकलेच्या तासाला कॅज्युअली घेतले जात आहे. चित्रकलेचा तास अन्य कारणांसाठी वापरुन घेतला जात आहे. म्हणूनच मग चित्रकला शिक्षक भरती झाली काय आणि नाही झाली काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय त्या त्या शाळा व महाविद्यालयांमधील मुलांच्या संख्येच्या प्रमाणात कलाशिक्षक नेमले जातात. जर मुलंच इच्छुक नसतील तर शिक्षक नेमांयचे कशाला? हा सवाल प्रशासनाने विचारला तर नवल नको. महिला चित्रकला शिक्षकांबाबत देखील हीच अनास्था कारणीभूत ठरतेये. जे शिक्षण नोकरी देणार नाही त्या पर्यायाला महिलांनी देखील नाकारले आहे.
-मुक्ता बालिगा, ज्येष्ठ चित्रकला शिक्षिका, नाशिक
ललित अथवा चित्रकला महाविद्यालयांमध्ये प्रवेश कमी का झालेत तर शालेय पातळीवर विद्यार्थ्यांपर्यंत चित्रकला पोहोचत नाही आहे. १०० विद्यार्थ्यांपैकी ३ विद्यार्थी ललित अथवा चित्रकला महाविद्यालयात येतात कारण शाळेतील चित्रकला शिक्षक मुलांना कलेशी जोडण्यात अपयशी ठरत आहेत. शालेय स्तरावरील चित्रकला शिक्षकांचे योगदान अत्यंंत निराशाजनक आहे. विद्यार्थ्याला लहान वयातच चित्रकलेची आवड निर्माण करण्यात, त्यात असलेल्या आवडीला प्रोत्साहन देण्यात त्ंयांना कुठलाही रस दिसून येत नाही. म्हणूनच विद्यार्थ्यांचीही चित्रकलेत रमण्याची कुठलीच मानसिकता राहिलेली नाही. भावी पिढीला माणूस म्हणून समृद्ध करायचे असेल तर चित्रकला शिक्षकांनी, शासनाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
-तुषार कट्यारे, ड्रॉईंग आणि पेंटिंग विभागप्रमुख, मविप्र ललित कला महाविद्यालय, नाशिक