निधीअभावी फाळके स्मारकाची दुरवस्था

निधीअभावी फाळके स्मारकाची दुरवस्था

नाशिक । निशिकांत पाटील Nashik

नाशिक महापालिकेतर्फे शहराच्या प्रवेशद्वारावर पांडवलेणीच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने भव्य अशा फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली. मात्र निधीअभावी डागडुजी केली नसल्याने दुरवस्था झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

फाळके स्मारक हा नाशिकच्या सौंदर्यात व महापालिकेच्या तिजोरीत भर टाकणारा प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर नाशिककरांसह बाहेरगावाहून येणार्‍या पर्यटकांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होती. उन्हाळ्यात तर या ठिकाणी असलेल्या वॉटर पार्कमध्ये जणूकाही जत्राच भरलेली असायची. या ठिकाणी पूर्वी हजारो लोक भेट देत आपल्या सुट्टीची मजा लुटत होते.

मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी महापालिकेने दुर्लक्ष केल्याने व पुरेशा निधीअभावी डागडुजी करण्यात न आल्याने दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या कमी होताना दिसत आहे. सुट्टीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी किंवा रविवारी या ठिकाणी तब्बल 300 ते 400 पर्यटक भेट देतात आणि यामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने डागडुजी व सुशोभीकरण करण्याकरता निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

सीसीटीव्ही वाढवण्याची गरज

फाळके स्मारकात दररोज येणार्‍या पर्यटकांपैकी काही पर्यटक पॅकिंग फूडचे रॅपर व पाण्याच्या बाटल्या उद्यानात टाकून अस्वच्छता पसरवत असल्याने अशा पर्यटकांवर नजर ठेवण्यासाठी तसेच या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये याकरता सीसीटीव्ही वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

वॉटर पार्क बंदच

या ठिकाणी असलेला वॉटर पार्क कोविडकाळानंतर बंद असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान तर होत आहेच मात्र यासोबतच सर्वसामान्य नाशिककरदेखील आनंदापासून मुकले आहेत. वॉटर पार्क बंद असल्याने या ठिकाणी असलेल्या जवळपास सर्वच वस्तूंची दुरवस्था झाल्याने त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे.

तुटलेल्या खेळण्या

लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या बर्‍याच खेळण्या तुटल्याने मुलांना त्याचा काहीच फायदा होत नसल्याने बाळगोपाळांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com