नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना लसीकरणाची प्रतिक्षा संपुष्टात येत असून शुक्रवारी (दि.८) जिल्ह्यात पाच ठिकाणी ‘ड्राय रन’ मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा रुग्णालय, त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय, सैय्यद पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बिटको व मालेगांव येथील आरोग्य केंद्र ही ठिकाणे ‘ड्राय रन’ साठी निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड19 लसीकरणाच्या ‘ड्राय रन’ नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत हेाते. मांढरे म्हणाले, ‘ड्राय रन’ साठी निवड केलेल्या आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ८ वाजता व कोविड-19 च्या ड्रायरनसाठी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना सकाळी 9 वाजता नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले आहे. ड्रायरन प्रक्रीया सकाळी दहा वाजता सुरू करण्यात येईल.

निवड करण्यात आलेल्या आरोग्य केंद्र येथे प्रत्येकी एक नोडल अधिकारी व कर्मचारी यांची टीम बनविण्यात आली असून या टिमने ड्राय रन दरम्यान मास्क व ग्लोजचा वापर करणे अनिवार्य आहे. लसीकरणासाठी तीन रूमची व्यवस्था करण्यात आली अाहे. पहिल्या वेटींग रूममध्ये निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांला सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन करून प्रत्येक लाभार्थ्यांचे तापमान घेण्यात येणार आहे.

दुसऱ्या व्हॅक्सिनेशनच्या रूममध्ये कोविन अॅप या ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्याची नोंद करण्यात येवून त्याला लसीकरणाची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्यांनतर त्याला लसीकरण करण्यात येईल. लसीकरण झाल्यावर तिसऱ्या ऑबझरव्हेशन रूममध्ये लाभार्थ्यांला अर्धा तास परिक्षणासाठी बसविण्यात येइल अशी माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.

३० हजार आरोग्य कर्मचार्यांना लस

लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील एकूण १८ हजार १३५ शासकीय व १२ हजार ४८० खाजगी संस्थामधील आरोग्य कर्मचारी यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले असून जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार 29 लसटोचकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच लसीकरण मोहिमे अंतर्गत लस साठविण्यासाठी २१० आयएलआर उपलब्ध असून यामध्ये एकावेळेस साधारण ११ लाख डोस साठवनीची क्षमता आहे.