रासाकाची निविदा काढा; अन्यथा उपोषण

कृती समितीतर्फे प्रांत पठारे यांना निवेदन
रासाकाची निविदा काढा; अन्यथा उपोषण

निफाड । प्रतिनिधी Niphad

ऑक्टोबर महिन्यापासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून अद्यापपर्यंत रासाका सुरू करण्याबाबत शासन स्तरावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही.

रासाका सुरू करण्याबाबत तालुक्यातील ज्येष्ठ नेते, आजी-माजी आमदार, मंत्री, खासदार यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली. मात्र आश्वासनापलिकडे कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आठ दिवसांच्या आता रासाका सुरू करण्याबाबत निविदा काढण्यात यावी अन्यथा त्याबाबत निफाडच्या उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा रासाका बचाव कृती समितीचे मुख्य प्रवर्तक नामदेव शिंदे यांचेसह कृती समितीने दिला आहे.

रासाका बचाव कृति समितीच्या वतीने निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील साखर कारखाने बंद असल्याने उस उत्पादक शेतकर्‍यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकर्‍यांच्या समस्या लक्षात घेता आम्ही रासाका बचाव कृति समितीच्या माध्यमातून रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करणेबाबत तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, आजी-माजी आमदार, खासदार, सहकारातील जाणकार व अनुभवी अशा सर्वच लोकांच्या भेटी घेऊन कारखाना चालू करणेबाबत चर्चा केली. तसेच माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार, नामदार दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याही प्रत्यक्ष भेटी घेऊन निवेदने दिली, त्यांनीही रासाका चालू करण्याबाबत आश्वासन दिले.

मात्र आता ऑक्टोबर महिन्यापासून साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून अद्यापपर्यंत शासनस्तरावर कारखाना सुरू करण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही. म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे शासनास सूचित करतो की, रानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंबंधीची शासनस्तरावरील संपूर्ण प्रक्रिया/कार्यवाही लवकर पूर्ण करावी. जेणेकरुन उस गाळप हंगाम वाया जाणार नाही.

अन्यथा रासाका बचाव कृती समिती उस उत्पादक शेतकर्‍यांसह आपल्या कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास सुरुवात करण्यात येईल असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर रासाका बचाव कृति समितीचे मुख्य प्रवर्तक नामदेव शिंदे, कार्याध्यक्ष धोंडीराम रायते, उपाध्यक्ष बाबूराव सानप, वैभव तासकर, चिटणीस सचिन वाघ, सरचिटणीस दत्तू मुरकुटे, विकास रायते, लक्ष्मण शिंदे, आशुतोष काळे, शिवराज थेटे, श्रीकांत जाधव, हरिष झाल्टे, हेमंत सानप, सुयोग गीते, वैभव कापसे आदींसह शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com