इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील २५० वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या " टोपबावडी " वर वाढलेल्या गवताची कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी साफसफाई करून बावडीचे जुने बांधकाम व इतिहास जपण्याचा प्रयत्न केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गिर्यारोहकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन केले. यावेळी शाहीर बाळासाहेब भगत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गीते सादर केली. या कार्यक्रमात कळसुबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, अभिजित कुलकर्णी, डॉ. महेंद्र आडोळे, गजानन चव्हाण, बाळू आरोटे, अशोक हेमके, प्रवीण भटाटे, दीपक बेलेकर, आदेश भगत, सोमनाथ भगत, उमेश दिवाकर, भाऊसाहेब जोशी, सुनील शिंदे, अतिष भडांगे, उत्तम भडांगे, मिलिंद डोळस, तुळशीराम मैले, प्रदीप काकुळते व इतर गिर्यारोहक सहभागी झाले होते.

टोपबावडीची ओळख : -

मुंबईहून नाशिकला येताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘ थळघाट ’ असे आहे. घाट चढताना डाव्या बाजूस दरी व उजव्या बाजूस उंच डोंगर आहे. त्यातल्या एका वळणावर एक अर्धवर्तुळाकार दगडी बांधकाम दिसते. या ठिकाणी जवळपास तीस पस्तीस फूट व्यासाची विहीर असून, त्यात कचरा किंवा जंगली प्राणी पडू नयेत म्हणून दगडी बांधकाम करून टोपलीसारखे छप्पर बांधले आहे.

आज देखील त्या डोंगरात वरच्या बाजूला असलेल्या चार वस्त्यांमधील महिला बांधकामात ठेवलेल्या खिडकीवजा खुल्या भागातून येथील वाडीतील ग्रामस्थ पाणी भरतात. जुन्या काळात वाटसरुंना, यात्रेकरुंना घाटामध्ये विसावा मिळावा व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ही विहीर व तिचे हे अर्धवर्तुळाकार घुमटासारखे छप्परअसलेले बांधकाम २५० वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहे.