आपु खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं !

भाकरीवर पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याचा जगातील पहिला प्रयोग...!
आपु खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं !

नाशिक | Nashik

चांदवड ( भाटगाव ) चे कलाशिक्षक देव हिरे यांचं महामानवाला अनोखं अभिवादन !

१४ एप्रिल २०२१ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव चे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांनी बाजरीच्या भाकरीवर डॉ.बाबासाहेबांची सही सह प्रतिमेची रांगोळी साकारण्याचा जो या आधी कधीही कुठेही न झालेला प्रयोग करून बाबासाहेबांना आगळं वेगळं अनोखं अभिवादन केलं आहे.

चित्ररेखाटन,फलक रेखाटन,रांगोळी रेखाटन इ.अंगी असलेल्या कलेतून समाजप्रबोधनाचे काम करणारे कलाशिक्षक म्हणून राज्य व राज्या बाहेर चांदवड चे श्री.देव हिरे यांची ओळख आहे.

१४ एप्रिल अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सादर केलेल्या या रांगोळीचं वेगळेपण सर्वांना आश्चर्यचकित करणारे आहे. 'माणूस म्हणून नाकारलं गेलेल्या उपेक्षित अनेक घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं अनमोल कार्य बाबासाहेबांनी केलं आहे. "आपु खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय रं..!"* या प्रसिद्ध गीताचे शब्द बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात.

हेच गीत ऐकून बाबासाहेबांची नुसती सहीच नाही तर प्रतिमेसह सही रांगोळी माध्यमातून ८ इंच व्यासाच्या भाकरीवर ६ इंच व्यासाची पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याचा जगातील पहिला प्रयोग कलाशिक्षक देव हिरे यांनी केला आहे. या प्रयोगात त्यांची पत्नी सौ.जयश्री हिरे यांचं मोलाचं प्रोत्साहन लाभलं. या रांगोळीची चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे संस्थाचालक, पदाधिकारी, सर्व शिक्षक, मित्र परिवार तसेच चांदवडचे नागरिक यांनी या अनोख्या रांगोळीचे भरभरून कौतुक केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com