प्रतिबंधित क्षेत्रात विनाकारण घराबाहेर पडू नका
नाशिक

प्रतिबंधित क्षेत्रात विनाकारण घराबाहेर पडू नका

पोलिसांचे आवाहन

Abhay Puntambekar

जुने नाशिक । प्रतिनिधी Old Nashik

महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जुने नाशिक परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहेत, म्हणून जोपर्यंत येथील करोना रुग्णांचा आकडा शून्यावर येत नाही तोपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही, नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शनिवारी सायंकाळी पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांच्यासह इतर अधिकारी तसेच महापालिकेच्या अधिकार्‍यांनी जुने नाशिक परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जुने नाशिक परिसरात मागील काही काळात करोनाचे रुग्ण मिळाले होते. यानुसार ठिकठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते, मात्र ७ जुलै २०२० रोजी महापालिका आयुक्तांनी एक विशेष आदेश काढून संपूर्ण जुने नाशिक परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले.

यानंतर येथील सर्व प्रकारच्या मार्गाबरोबर दुकानेदेखील बंद करण्यात आले. रुग्णसंख्या अधिक होती त्यावेळी असे बंंद झाले नव्हते, मात्र आता रुग्णसंख्या अगदी कमी असताना ही कडक बंद का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून या बंदला विरोध केला आहे. मात्र जोपर्यंत प्रशासनाचे आदेश येत नाही तोपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार आहे.

दूध बाजार सारडा सर्कलवर शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शहीद अब्दुल हमीद चौक येथील दूध बाजाराला पोलिसांनी मध्यस्थी करून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आज रविवारपासून सारडा सर्कल येथील जागेत दूध बाजार भरत आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही तर दूध व्यावसायिकांना देखील तात्पुरती सोय पोलिसांनी करून दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com