बागलाणात 60 गावांमध्ये डोंगर्‍यादेव उत्सवाची धूम

बागलाणात 60 गावांमध्ये डोंगर्‍यादेव उत्सवाची धूम
Dipak

मुंजवाड । वार्ताहर Munjvad-Baglan

आदिवासींचे (Tribal community) ग्रामदैवत असलेल्या डोंगर्‍यादेव उत्सवास (Dongaryadev Utsava) बागलाण तालुक्यातील (baglan taluka) 60 गावांमध्ये मोठया उत्साहात प्रारंभ झाला आहे. चौंधाणे येथे गावात परतलेल्या माऊल्यांचे पुजन करीत आ. दिलीप बोरसे (mla dilip borse) यांनी त्यांचे स्वागत केले. खळीवर पोहचलेल्या माऊल्यांसमवेत पावरीच्या तालावर ठेका धरत आ. बोरसे यांनी नृत्य देखील केले.

तालुक्यातील चौंधाणे गत सप्ताहापासून डोंगर्‍यादेव उत्सवास आदिवासी बांधवांतर्फे पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला आहे. आठ दिवसांपासून बाहेरगावी गेलेल्या माऊल्या गावात परत आल्यानंतर आ. बोरसे यांच्या हस्ते पुजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावातील महिलांनी ताटामध्ये दिवे पेटवून रस्त्याच्या दोन्ही बाजूस स्वागतास उभ्या होत्या. यावेळी फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली. संपूर्ण गावातुन फिरून माऊल्या खळीवर पोहचल्या या वेळी आ. बोरसेंनी पावरीच्या तालावर ठेका धरून माऊल्यांसमवेत नृत्य केले.

त्यांच्या समवेत माजी सरपंच राकेश मोरे, नामपूर बाजार समिती संचालक भाऊसाहेब भामरे, चंद्रकांत मानकर, भैय्या भामरे उपस्थित होते. या उत्सवाची सांगता मार्गशीर्ष पौर्णिमेला कंसरा गडावरील कंसरा मातेची पुजा करून करण्यात येणार आहे. गावात दर तीन वर्षांनी हा उत्सव होत असल्याने संपूर्ण गाव या उत्सवात सहभागी असतो.

या गावातील डोंगर्‍यादेव उत्सव पहाण्यास परिसरातील आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित राहत आहेत. पंधराव्या वित्त आयोगातून आदिवासींच्या या सोहळ्यासाठी निधीची व्यवस्था करून देणारी बागलाण तालुक्यातील ही पहिलीच ग्रामपंचायत आहे यासाठी सरपंच लीला मोरे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरवठा करून या निधीची तरतूद करून घेतली.

आदीवासींची ही लोककला व व्रताची परंपरा टिकुन रहावी यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न गौरवास्पद आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी आजचा सुशिक्षित आदिवासी सुद्धा ही व्रते अगदी काटेकोरपणे व तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहे. आदीवासींच्या व्रतांपैकी एक असलेल्या डोंगर्‍यादेव उत्सवातील नियम आचरणात आणणे खुप कठीण असतात.

समाज अडाणी असूनही ही परंपरा सांभाळत आहे. तालुक्यात व संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा व्हावा यासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे आ. दिलीप बोरसे यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुक्यातील साठ गावांमध्ये हा उत्सव सुरू असून मार्गशीर्ष पौर्णिमेला बागलाण व साक्री तालुक्यातील विविध गडांवर जाऊन कंसरा मातेचे दर्शन घेऊन सोहळ्याची सांगता केली जावून दुसर्‍या दिवशी गावागावात भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com