जेवणाचे बिल देता का कोणी?

पंचायत राज समिती दौर्‍याचे अजूनही पडसाद
जेवणाचे बिल देता का कोणी?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या नाशिक दौर्‍याचे ( Panchayat Raj Samiti's visited to Nashik )पडसाद अजूनही उमटत आहेत. आर्थिक वर्गणी गोळा करण्यावरून गाजलेल्या समितीच्या दौर्‍यात समिती सदस्यांसह त्यांच्या समवेत आलेल्या कार्यकर्त्यांना व्हेजसह नॉनव्हेजवर ताव मारला. मात्र, यानंतर संबंधित ठेकेदारास जेवणाचा खर्च देणे ( Bill for meals)अपेक्षित असताना संबंधित बिलासाठी चकरा मारत असल्याचे कळते.

संबंधित व्यक्तीला जेवणावळीच्या बिलांसाठी जिल्हा परिषद मुख्यालयात चकरा मारण्याची नामुष्की आली आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसीय दौर्‍यात आ. दिलीप बनकर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी एकवेळचे जेवण दिले तसेच एक दिवस समिती तालुका दौर्‍यावर होती. असे असतानाही, तीन दिवसांचा चहा, नाश्ता यासह जेवणाचा खर्च 9 लाखांवर गेल्याने आश्यर्च व्यक्त केले जात आहे.

समिती मागील आठवड्यात तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर होती. 25 सदस्य असलेल्या समितीत सहा सदस्य निमंत्रित होते. त्यांच्यासमवेत स्वीय सहाय्यक यांसह निवडक पदाधिकारीही उपस्थित होते. या सर्व लवाजम्याची बडदास्त शासकीय विश्रागृहासह शहरातील अलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली होती.

समिती सदस्यांचा दौरा तीन दिवसांचा असला तरी काही सदस्य हे एक दिवस अगोदर मुक्कामी आले व काही दौर्‍यानंतरही एक दिवस मुक्कामी होते. त्यामुळे या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा परिषदेने एका खासगी केटरर्स चालकाकडे सोपवली होती. यात सकाळचा चहा, नास्ता, दुपारचे जेवण, पाणी बॉटल आणि रात्रीचे जेवण अशी सर्व व्यवस्था होती. बैठकीच्या ठिकाणी ड्रायफ्रुट्सची व्यवस्था देखील केलेली होती. या तीन दिवसांमध्ये 1200 जेवणाच्या थाळया लागल्याचे सांगितले जात आहे.

त्याचबरोबर नास्ता, चहा व पाणी पुरविण्यात आले. या सर्वांचे बिल 9 लाखांवर पोहोचले आहे. केटरर्स चालकाने हे बिल जिल्हा परिषदेकडे दिले आहे. परंतु, अद्याप संबंधितांस बिलाचे पैसे मिळालेले नाहीत. या तीन दिवसांमध्ये शुक्रवारी रात्रीचे जेवण निफाडचे आ. दिलीप बनकर यांनी दिले. तर जिल्हा परिषद अध्यक्ष क्षीरसागर यांनी एक वेळ जेवणाची व्यवस्था केलेली होती. समिती शुक्रवारी दिवसभर ग्रामीण भागात दौर्‍यावर होती. असे असतानाही हा सर्व खर्च जिल्हा परिषदेच्या माथी मारण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com