हरसूल । Harsul

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुरंबी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उबुरणापाडा येथील शाळेच्या दुरुस्तीचे गेल्या एक वर्षांपासून काम रखडल्याने पंचायत समितीच्या माजी सभापती योगिता मौळे यांच्यासह ग्रामस्थांनी त्वरित शाळेचे रखडलेले काम पूर्ण करावे अशी मागणी केली असून मागणी पूर्ण न झाल्यास ग्रामस्थांसह उपोषणाचा इशारा दिला आहे.

मुरंबी (ता.त्र्यंबकेश्वर) येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत पाचवी पर्यंत वर्ग असून द्विशिक्षकी शाळा आहे. गेल्या एक वर्षांपासून ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार उबुरणापाडा येथे ग्रामपंचायततर्फे शाळा दुरुस्तीचे काम हाती घेतले असून अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. ग्रामपंचायत माध्यमातून करण्यात येणारे काम कोणत्या निधीतून आहे.

कामाची अंदाजित रक्कम, कालावधी याबाबत कुठेही माहितीचा फलक अथवा ग्रामस्थांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या वर्ष भराच्या कालावधीत या शाळेच्या दुरुस्तीच्या कामाकडे सबधितांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. सद्यस्थितीत या शाळेच्या दुरुस्ती कामकाजात रंग तसेच दरवाजे बसविण्यात आले असून दरवाजा ही अपूर्ण अवस्थेत आहे. त्याचबरोबर मोडलेल्या अवस्थेत आहे. देण्यात आलेला रंग ही अपूर्ण अवस्थेत असून खिडक्या ही बसविलेल्या नाहीत. यामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा दुरुस्तीचे काम का रखडले? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला असून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या उबुरणापाड्याबरोबर वटकपाडा, काकडवळण, भासवड, बुरुड येथेही शाळा दुरुस्तीची कामे अपूर्ण असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

त्वरित रखडलेले काम पूर्णत्वास न्यावे अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा प.स.माजी सभापती योगिता मौळे, शंकर मौळे, गंगाराम राऊत, रामू भोये, विठ्ठल राऊत, जिजाबाई राऊत, किसन गवळी, वेणू गवळी गंगाराम गवळी, मनोहर राऊत, अनुसया राऊत, जयराम राऊत, जनार्धन राऊत, कुसूम राऊत, गणपत राऊत आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.

मुरंबी ग्रामपंचायतीने पाड्यातील अनेक शाळांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. मात्र निकृष्ट दर्जाचे केले आहे. उबुरणा येथील कामात अनेक त्रुटी दिसून येत आहे. वरिष्ठांनी सखोल चौकशी करून कारवाई करावी,काम पूर्ण न झाल्यास उपोषण करण्यात येईल.

योगिता मौळे, माजी सभापती प.स.त्र्यंबकेश्वर