गारपीटग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करा : आ. बनकर

गारपीटग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करा : आ. बनकर

पालखेड मिरचीचे। वार्ताहर Palkhed Mirchiche

तालुक्याच्या उत्तरपूर्व परिसरात झालेल्या गारपिटीने द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने आमदार दिलीप बनकर MLA Dilip Bankar यांनी कुंभारी परिसरातील Kumbhari नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पहाणी करून संबंधित अधिकार्‍यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत.

पालखेड, कुंभारी, आहेरगाव, पंचकेश्वर आदींसह तालुक्याच्या उत्तरपूर्व भागात बुधवारी सायंकाळी झालेल्या ढगफुटीमुळे द्राक्षपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. साहजिकच आमदार दिलीप बनकर यांनी य पीक नुकसानीची पाहणी केली त्यांच्यासमवेत तहसीलदार शरद घोरपडे, तालुका कृषि अधिकारी भटू पाटील, मंडळ अधिकारी शितल कुयटे, कृषि सहाय्यक कांबळे, कामगार तलाठी विठ्ठल पोटरे, ग्रामसेवक भरत कदम, कुंभारी सरपंच राजेंद्र जाधव उपस्थित होते.

तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह काही परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे दोन हात करत लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरवातीला द्राक्ष बागेची छाटणी करून दोन पैसे अधिक मिळतील या उद्देशाने शेतकर्‍यांनी लवकर छाटणी केली. साहजिकच झाडांवरील नविन फुटव्याला या गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे.

दोन वर्षांपूर्वी अवकाळी तर मागील वर्षी करोना महामारीमुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाबरोबरच खरीप हंगामातील सोयाबीन, मका, कांदा, भाजीपाला आदी पिकांचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना पंचनामे करून तसे अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

याप्रसंगी जयराम जाधव, वाळू जाधव, नितिन विलास जाधव, भानुदास पर्बत जाधव, रघुनाथ जाधव, कचरू एकनाथ जाधव, पुंडलिक कारभारी जाधव आदींसह कुंभारी, पालखेड, देवपूर, पंचकेश्वर, आहेरगाव परिसरातील नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

पाणी निचर्‍याकडे लक्ष द्यावे

गारपिटीने जखम झालेल्या झाडांवरील नविन फुटी काढुन तत्काळ उपाययोजना म्हणून बाह्यस्पर्शी व आंतरप्रवाही बुरशीनाशकांची फवारणी करावी. ठिबक सिंचनद्वारे विविध प्रकारचे बुरशीचे जिवाणू सोडवे ज्यामुळे पांढरी मुळे सक्षमपणे कार्यरत होईल. झाडांवरील गारपीटग्रस्त नविन फुटी बागेबाहेर काढुन टाकाव्यात व बागेताल पाण्याचा निचरा होईल याकडे शेतकर्‍यांनी लक्ष द्यावे.

मनोहर थेटे, संचालक (द्राक्षबागायतदार संघ)

Related Stories

No stories found.