रोहयोच्या लेबर बजेटची आखणी करा

अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या अधिकार्‍यांना सूचना
रोहयोच्या लेबर बजेटची आखणी करा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee scheme ) योजनेंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध ’ आणि ‘गाव समृद्ध तर मी समृद्ध’ या विचारातून रोहयो कामांच्या ‘लेबर बजेट’ची आखणी करण्याच्या सूचना राज्याचे मृद, जलसंधारण व रोहयो विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार ( Nandkumar, Additional Chief Secretary, Rohyo Division) यांनी नाशिक विभागातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ‘समृद्धी लेबर बजेट 2022-23’ अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ते पुढे म्हणाले की, रोजगार हमी योजनेतंर्गत अधिकचे कामे देवून दारिद्रयरेषेखालील नागरिकांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी गावातील प्रत्येक कुंटुबांला नरेगाच्या माध्यमातून वर्षाला निव्वळ नफा एक लाख रुपयापर्यंत मिळायला हवा यासाठी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावपातळीवर नियोजन करावे, अशा सूचना अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी दिल्या. कामाची गरज असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तेव्हा काम देण्यात येवून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यात यावी,

अपर मुख्य सचिव नंदकुमार म्हणाले, समृद्धी लेबर बजेट 2022-23 अंतर्गत गावे समृद्ध करताना समाजाचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे या योजनेची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, मजूर, महिला, तरुण या सर्वांना फक्त रोजगारासोबतच त्यांचे जीवन समृद्ध होणार असल्याची जाणीव करुन देणे आवश्यक असल्याचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, समृध्द गाव या संकल्पनेनुसार रोहयो योजनेअंर्गत सर्व यंत्रणेच्या समन्वयातून समृद्धी लेबर बजेट व आराखडा तयार करण्यात येईल. शेतकर्‍यांसह शेतमजूर, भूमिहीन, मजूर, महिला, तरुण यांच्या आर्थिक विकासासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचेही विभागीय आयुक्त गमे यांनी सांगितले.

यावेळी अपर मुख्य सचिव नंदकुमार बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यालय नागपूरचे आयुक्त शान्तनू गोयल, नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त (रोहयो) डॉ. अर्जुन चिखले, उपजिल्हाधिकारी रोहयो नाशिक नितीन मुंडावरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील बैठकीस ऑनलाइन उपस्थित होते.

अशी आहे समृद्धी लेबर बजेट संकल्पना

राज्यातील गावे समृद्ध करुन अकुशल कामे मागणार्‍यांची संख्या हळूहळू कमी होईल. या उद्देशाने येणार्‍या काळात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंर्गत नियोजन करण्यात येणार आहे. नियोजनाचे केंद्रबिदू ग्रामपंचायत असल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील गांवे कसे समृद्ध होतील व त्या गावातील लोक श्रीमंतीच्या मार्गावर कसे जातील, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतीचा लेबर बजेट व कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिक उन्नती आणण्याच्या दृष्टीने गावात ज्या कामांची गरज आहे त्यांचे चिन्हांकन करुन अकुशल कामांच्या भरवशावर जगणार्‍या कुटुंबांना त्या कामांमध्ये अशा पध्दतीने सहभागी करुन घेण्यात येणार आहे. ज्यामुळे भविष्यात ते कुंटुंब स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारुन अकुशल कामाची मागणीच करणार नाही. असा या लेबर बजेट व कृती आराखड्याचा उद्देश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com