दोन दिवसांत पंचनामे करा - आ. कोकाटे

दोन दिवसांत पंचनामे करा - आ. कोकाटे

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सरस्वती नदीकाठ व तालुक्यातील शेती, रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे करून शासनाला अहवाल पाठवण्याच्या सूचना आमदार माणिकराव कोकाटे ( MLA Manikrao Kokate )यांनी अधिकार्‍यांना केल्या.

अधिकार्‍यांसह शहरातील सरस्वती नदी( Saraswati River ) पात्रालगत नुकसान झालेल्या भागाची पाहणी केल्यानंतर नगरपरिषद कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रांताधिकारी अर्चना पठारे, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे, नायब तहसीलदार सागर मुंदडा, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता प्रवीण भोसले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून भैरवनाथ तळ्यातील व आयटीआयटी पाठीमागील तळ्याची दुरस्ती झालेली नाही. त्यातील सांडव्याचे पाणी आल्याने व अतिवृष्टी झाल्याने सरस्वती नदीला पूर आल्याचे त्यांनी सांगितले. सरस्वती नदीपात्राचे पुनर्जीवन करताना निधी येऊनही पाहिजे ती काळजी घेतली गेली नसल्याचा आरोप कोकाटे यांनी केला. स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

ज्यांची घरे वाहून गेली त्यांना मंगल कार्यालये व सभागृहात जागा देण्यासह त्यांच्या भोजनाची व्यवस्था सामाजिक कार्यकर्त्यांकडून ठेवली जात असल्याचे आ. कोकाटे म्हणाले. जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून त्याचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी तहसील व नगरपरिषद प्रशासनाला दिल्या. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय व मदत आणि पुनर्वसन विभागाला पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. रोगराई निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना आ. कोकाटे यांनी आरोग्य विभागाला केल्या.

तीनजण वाहून गेल्याची भीती

सरस्वतीला आलेल्या पुराने शहरातील तीनजण वाहून गेल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. गोजरे मळा येथे राहणारा सोनालाल दशरथ महंत हा समृद्धी महामार्गाचा कामगार सायंकाळी बाजारात आला होता. मात्र, त्यानंतर तो बेपत्ता झाला. अपना गॅरेज पाठीमागील झोपडपट्टीतील एक 22 वर्षांचा तरुण पाण्यात वाहून गेल्याचा संशय असून अजून एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. दातली येथील बंधार्‍यात एक अनोळखी मृतदेह मिळून आला असून त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

20 सेवकांचे पथक

सिन्नर शहरात नुकसान झालेल्या घरांचे व दुकानांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरपरिषदेचे 10 आणि महसूल विभागाचे 10 असे 20 कर्मचार्‍यांचे पथक सर्व पंचनामे करत आहेत. सर्वांचे पंचनामे केले जाणार असून नागरिकांनी घाई करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com