जिल्हा परिषदेला दिवाळी भेट

वडांगळी ग्रामपंचायतीकडून एक रकमी कर्जफेड
जिल्हा परिषदेला दिवाळी भेट

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

तालुक्यातील वडांगळी या ग्रामपंचायतीने ( vadangali Grampanchayat ) 18 वर्षांपूर्वी माणिकराव कोकाटे व्यापारी संकुल बांधण्यासाठी जिल्हा परिषदेकडून घेतलेले कर्ज एक रकमी परतफेड करत जिल्हा परिषदेला एक प्रकारची दिवाळी भेट देत नवीनच पदभार स्वीकारलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांचे स्वागत केले आहे. आ. कोकाटे, इगतपुरीचे आ.हिरामण खोसकर, सरपंच राहुल खुळे यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश मित्तल यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.

गावातील विविध विकास कामांसाठी जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायत विभागामार्फत ग्रामनिधी कर्ज संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात येते. वडांगळी ग्रामपंचायतने व्यापारी संकुल बांधकामासाठी 2004 साली 12 लाख रुपयांचे ग्रामनिधी कर्ज घेतले होते. ग्रामपंचायतने वेळोवेळी पैसे परत करत सुमारे 8 लाख 73 हजारांची रक्कम जिल्हा परिषदेला आजपर्यंत परत केलेली होती. त्यामुळे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची 27 सप्टेंबर रोजी बैठक घेऊन थकबाकी जमा करण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर तंटामुक्ती अध्यक्ष सुदेश खुळे व सरपंच राहुल खुळे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यकारणी व ग्रामसेवक पांडुरंग सोळंकी यांनी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेत दिवाळीच्या अगोदर कुठल्याही परिस्थितीत ग्रामपंचायत कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी एक विशेष वसुली कार्यक्रम आखण्यात आला. त्यामध्ये थकबाकीदारांची यादी सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध करणे, गावातील चौकात बॅनर लावणे, नळ कनेक्शन कट करणे व खाजगी मालमत्तेवर बोजा चढवणे अशा उपक्रमांचा त्यात समावेश होता.

मात्र, केवळ पंधरा दिवसात वडांगळीतील सुज्ञ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे 18 लाख रुपये स्वतःहून घरपट्टी व पाणीपट्टी ग्रामपंचायत कार्यालय जमा केली. यातूनच ग्रामनिधीचे 10 लाख 3 हजार 383 रु व ग्रामपंचायतीला मिळणारे मुद्रांक शुल्क 4 लाख 14 हजार 282 रु. जमा करत वडांगळी ग्रामपंचायतने जिल्हा परिषदकडे सुपुर्द करण्याचा निर्णय घेतला. वडांगळी ग्रामपंचायतने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून अशा प्रकारे इतर थकबाकी असलेल्या ग्रामपंचायतींनी आदर्श घेत कामकाज करावे असा शब्दात मित्तल यांनी कौतुक केले. यावेळी उपसरपंच रवींद्र माळी, योगेश घोटेकर, अमोल अढांगळे, विक्रम खुळे, उपस्थित होते.

सर्व संस्था ऊर्जितावस्थेत

गेल्या अनेक वर्षांपासून विकास संस्था, ग्रीन व्हिजन व ग्रामपंचायत मतदारांच्या आशीर्वादाने ताब्यात असून इतर संस्थांंप्रमाणे ग्रामपंचायत देखील ऊर्जित अवस्थेत आल्याने विशेष समाधान आहे. ग्रामपंचायत या पुढील काळात अधिक सर्वांगीण विकास करेल यात शंका नाही.

सुदेश खुळे, तंटामुक्ती अध्यक्ष, वडांगळी.

कर्जमुक्तीचा आनंद

आमदार माणिकराव कोकाटे यांनी आम्हाला सकारात्मक विचारांनी काम करण्याचा मूलमंत्र दिलेला आहे. त्यानुसार 18 वर्षांपूर्वीचे कर्ज फेडले. तत्कालीन ग्रामपंचायत सदस्यांनी गाव विकासासाठीच हे कर्ज घेतले होते. आम्ही ग्रामपंचायत कर्जमुक्त केल्याचा आनंद आहे.

राहुल अरुण खुळे, सरपंच, वडांगळी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com