राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय होणार सुरु

महिलांच्या तक्रारींचे होणार निवारण : ८ मार्चला
राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय होणार सुरु

नाशिक । Nashik

महिलांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय 8 मार्च पासून सुरु करण्यात येणार आहे.

विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगांव, धुळे आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमधील या विभागीय कार्यालयामुळे महिलांच्या तक्रारींचे निवारण होणार असल्याची माहिती, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी दिली आहे.

शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने १० फेब्रुवारी २०२१ ला घेतलेल्या निर्णयानुसार राज्य महिला आयोगाचे विभागीय कार्यालय ८ मार्चपासून सुर करण्यात येणार आहे. या कार्यालयामार्फत महिलांना तज्ज्ञ समुपदेशकांमार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच यासाठी पोलीस स्टेशनचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.

महिलांसदर्भातील अति महत्वाच्या गंभीर स्वरुपाच्या किंवा सु-मोटो नोंद घ्यावयाच्या तक्रारीबाबत राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्यात येईल. तसेच या कार्यालयामार्फत प्रस्तावित किंवा नियोजित सुनावण्या ह्या ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे.

या कार्यालयाच्या कामकाजासाठी विधी सल्लागार, संरक्षण अधिकारी, समुपदेशक व लिपीक पदांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही, उपायुक्त पगारे यांनी दिली.

नाशिक विभागातील अत्याचाराने पीडीत असलेल्या महिलांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास विभाग, नाशिक विभाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन, विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com